(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena : पारदर्शक प्रक्रियेनेच शिवसेना कुणाची याचा निर्णय होईल; केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची प्रतिक्रिया
Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना कुणाची याचा फैसला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई: शिवसेना (Shivsena) कुणाची याचा निर्णय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना कुणाची याचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये ते बोलत होते.
बहुमताच्या आधारावर निर्णय होणार
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला द्यायचं याबाबत निर्णय देणार आहे. पक्ष कुणाचा हा निर्णय बहुमताच्या आधारे म्हणजे रुल ऑफ मेजॉरिटीच्या माध्यमातून घेण्यात येतो असा इतिहास आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील पदाधिकारी कोणत्या बाजूला आहेत यावर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
यासाठी दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून नोटिस बजावण्यात आली आहे. त्यावर दोन्ही गटांकडून उत्तर येईल. त्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं किंवा पुरावे मागून घेण्यात येतील. त्यानंतर शिवसेना कुणाची किंवा पक्षचिन्ह कुणाचं यावर निर्णय देण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली होती. त्यावर निवडणूक आयोगाला निर्णय द्यावा लागणार आहे. या आधी ठाकरे गटाला आपली कागदपत्रं जमा करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावर ठाकरे गटाकडून दोन वेळा मुदतवाढीची मागणी केली होती. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.
केंद्रीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असून त्याच्या कार्यवाहीला आम्ही स्थगिती देणार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रीन सिग्नलनंतर शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. ठाकरे गटाच्या वतीनं कागदपत्रं जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागण्यात येणार का हे पाहावं लागेल.
शिवसेना कुणाची याचा निर्णय येत्या महिना किंवा दीड महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाच्या दाव्याची प्रत मिळावी, ठाकरे गटाकडून करण्यात येणार
शिंदे गटाने निवडणूक आयोगात सादर केलेल्या दाव्यांची प्रत, कागदपत्रं आधी आम्हाला मिळावीत अशी विनंती ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला केली जाणार असल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगातल्या लढाईत शिवसेनाच्या वतीनं हे पहिलं पाऊल उचलण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या दाव्यांची तपासणी करून मग ठाकरे गटाकडून कागदपत्रे दाखल करण्याची हालचाल सुरू होणार आहेत.