राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल
Deal With Microsoft: मायक्रोसॉफ्टसोबत होत असलेल्या करारामुळे देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये येत असल्याने मुंबईसाठी मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.

Deal With Microsoft: राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्टमध्ये आज महत्त्वपूर्ण करार होणार आहे. या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईमध्ये येणार आहेत. त्यामुळे मुंबईसाठी कोणती मोठी घोषणा होणार याकडे लक्ष आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असून अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मायक्रोसॉफ्टसोबत होत असलेल्या करारामुळे देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये येत असल्याने मुंबईसाठी मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. मात्र हा करार कोणत्या संदर्भातील आहे याची स्पष्टता आलेली नाही.
देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात होणार!
दरम्यान, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता, 2026 मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड उभारण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी आवश्यक जागेची निश्चिती करण्यात यावी. जयगड, आंग्रे, रेडी आणि विजयदुर्ग बंदरांचा विकास करण्यासाठी वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग तयार करावा. या मार्गासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाची तरतूद करण्यात यावी. तसेच, वाढवण बंदर ते नाशिकपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे महामार्ग तयार केला जात आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रभावित क्षेत्रांचा विचार करून विकासाचे नियोजन करावे.
बंदर असलेल्या परिसराच्या विकासाचे महत्त्व लक्षात घेता, या ठिकाणी उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करावे. या परिसरात औद्योगिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व बंदरे विभाग यांच्या समन्वयातून कंपनी स्थापन करावी. निर्माणाधीन वाढवण बंदर लक्षात घेता, मोठ्या बंदरांचा आणि संबंधित परिसराचा विकास करण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण निर्माण करावे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी बोटी पूर्णपणे इलेक्ट्रिक असाव्यात. सुरुवातीला हायब्रीड मॉडेल उपयोगात आणावे, नवीन बोटींची खरेदी करावी. कोचीपेक्षाही मोठा मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प असला पाहिजे, या पद्धतीने प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पांतर्गत 21 टर्मिनल्सची निर्मिती करण्यात येईल आणि 200 नॉटिकल माइल मार्ग निर्माण करण्यात येईल. या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यावेळी मंत्री नितेश राणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या
























