शिवाजीला जिवंत सोडलं नसतं तर... मरण्यापूर्वी औरंगजेबाच्या मनातील खंत सांगते 'शिवाजी' या शब्दातील ताकद
Chh.Shivaji Maharaj : शिवरायांचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या औरंगजेबालाही शेवटी त्यांची महती मान्य करावी लागली होती, औरंगजेबाच्या आयुष्याचा शेवटही 'शिवाजी' या शब्दानेच झाला.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारताच मराठ्यांच्या अंगावर शहारे येतात, अंगात एक प्रकारचं स्फुरण चढतं, आजही जवळपास साडेतीनशे वर्षे होऊन गेली तरीही 'शिवाजी' हे नाव अनेक संकटांवर मात करण्यासाठी पुरेसं आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असं म्हणताच आपल्यामध्ये एक प्रकारची उर्जा येते, नैराश्याने ग्रासलेल्यांसाठी तर ही संजीवनी ठरते. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी रायगडावर देह ठेवला, आज त्या घटनेला जवळपास साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली असली तरीही त्या नावातील उर्जा मात्र कायम आहे. मराठ्यांना प्रेरणा देणाऱ्या शिवाजी महाराज या नावाने हिंदुस्तानचा शहेनशाह औरंगजेबाच्या मनाला मात्र मरेपर्यंत वेदना दिल्या. औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटलेल्या शिवाजी महाराजांच्याबद्दल, त्या घटनेनंतर 40 वर्षानंतरही औरंगजेबाच्या मनात खेद होता हे त्याच्या मृत्यूपत्रातून स्पष्ट होतंय. आपल्या निष्काळजीपणामुळे शिवाजी नजरकैदेतून पळाला आणि जीवनाच्या अखेरपर्यंत आपल्याला मराठ्यांची झगडावं लागलं याचं दु:ख औरंगजेबाच्या मृत्यूपत्रातून दिसून येतंय.
अवघ्या 14 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांच्या साथीने शिवरायांनी पहिला घाव निजामावर घातला, त्याची निजामशाही गर्दीस मिळवली. त्यानंतर अफजलखानसारख्या बलाढ्य सरदाराला मातीत मिळवलं आणि आदिलशाही मोडकळीस आणली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मोघलांकडे वळवला.
औरंगजेबाचं स्वप्न भंगलं
मराठ्यांच्या वाढत्या प्रस्थाला आळा घालण्यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगना दक्षिणेत पाठवलं. मिर्झाराजेंच्या बलाढ्य सेनेमुळे शिवाजी महाराजांना मोघलांसोबत तह करावं लागला. त्यानुसार शिवाजी महाराजांनी आग्र्याला जावं आणि औरंगजेबाची भेट घ्यावी असं ठरलं.
सन 1666 साली शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची भेट घेतली, पण कपटी औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत टाकलं. मोठ्या शिताफीने शिवाजी महाराज त्यातून निसटले आणि स्वराज्यात पोहोचले. त्यामुळे शिवाजी महाराजांना ठार मारायचं आणि स्वराज्य ताब्यात घ्यायचं हे औरंगजेबाचं स्वप्न भंगलं.
शिवाजी महाराजांचा मृत्यू
चैत्र शुद्ध पोर्णिमेचा दिवस होता, 3 एप्रिल 1680 रोजी मराठ्यांच्या या राजाने देह ठेवला आणि अवघा मुलूख पोरका झाला. छत्रपती शिवरायाच्या मृत्यूमुळे सर्वांनाच एक प्रकारचा धक्का बसला होता. पण त्यातूनही मराठा साम्राज्य सावरलं.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच मराठा साम्राज्य जिंकू अशा अविर्भावात औरंगजेब दिल्लीवरून महाराष्ट्रात आला. औरंगजेब हा शिवाजी महाराजांच्या पेक्षा 12 वर्षाने मोठा होता. शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब 27 वर्षे आयुष्य जगला. पण या काळात त्याला मराठा साम्राज्य मात्र घेता आलं नाही. उलट त्याच्या हयातीत मराठ्यांनी गुजरात, मावळ, कर्नाटकच्या मुघल साम्राज्याचे लचके तोडले, मुघलांना नामोहरण केलं.
काय आहे औरंगजेबाच्या मृत्यूपत्रात?
मराठा साम्राज्य हाहा म्हणता सहज जिंकू असं म्हणणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी मातीत मिळवलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्षे त्याला मराठा साम्राज्य जिंकता आलं नाही. शेवटी 20 फेब्रुवारी 1707 रोजी त्याचा मृत्यू झाला.
आपल्या मृत्यूची चाहूल लागलेल्या औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. 12 सूचनांचं पत्र इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी भाषांतरित केलं असून बिकानेर म्युझिअममध्ये आजही त्याची मूळ प्रत उपलब्ध आहे. त्यामध्ये औरंगजेबाने त्याच्या मुलांसाठी अनेक आदेश आणि सूचना केल्या आहेत.
शिवाजीला जिवंत सोडणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक
हिंदुस्तानचा शहेनशाह असलेल्या औरंगजेबाला शिवाजी महाराज त्याच्या हातून निसटल्याची खंत शेवटपर्यंत राहिली. शिवाजी महाराजांना त्याच वेळी मारलं असतं तर इतिहास वेगळाच असता, ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं औरंगजेबानं मान्य केलं. त्याच चुकीमुळे आलमगीर औरंगजेबाचा शेवट हास्यास्पद झाला, त्याचे अनेक सरदार त्याच्यावर हसू लागले.
आपल्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात अंदाधुंदी माजणार याची खात्री असलेल्या औरंगजेबाने 12 सूचनांचं मृत्यूपत्र लिहिलं. मी ज्या टोप्या शिवल्या त्याचे 4 रुपये 2 आणे मिळाले आहेत, त्यातून मिळणारं कापड माझ्या कफनावर टाका असं औरंगजेब म्हणतोय. प्रेतयात्रा वाजत गाजत नको, दक्षिणेतील सेवकांना आदर द्यावा अशा काही सूचना त्याने केल्या आहेत. त्यामध्ये 12 वी आणि शेटची सूचना महत्त्वाची आहे.
राज्यातील सगळी माहिती खडानखडा राजाला कळणे हे राज्य चालवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असल्याचं औरंगजेब म्हणतोय. माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजरकैदेतून पळाला आणि माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांची झगडावं लागलं अशी खंत त्याने व्यक्त केली. एका क्षणात जगाची उलथापालथ होऊ शकते, त्यामुळे गाफील राहू नका अशा सूचना त्याने केल्या आहेत.
1666 साली शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले आणि 1707 साली, औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याला त्याची खंत वाटत राहिली. या घटनेनंतर मराठ्यांनी शेवटपर्यंत त्याला झुंजवलं. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या मृ्तूनंतरही मराठ्यांनी झुंजवलं. औरंगजेब निष्काळजी राहिला नसता आणि त्याने शिवरायांना त्याच वेळी ठार केलं असतं तर आज इतिहास बदलला असता.
शिवाजी महाराजांची महती मान्य केली
अखंड हिदुस्तानावर राज्य करणारा, आलमगीर या नावाने प्रसिद्ध असलेला औरंगजेब शिवाजी महाराजांच्या समोर मात्र हारला होता, मराठ्यांसमोर पुरता हैराण झाला होता. शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्या जिंकण्यासाठी एखादा मुघल सम्राट स्वतः दक्षिणेत येणं ही एकमेव घटना. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिवंत असतानाही हैराण केलं, मृत्यूनंतरही झुंजवलं. 'शिवाजी' हे नाव घेतल्याशिवाय औरंगजेबाच्या इतिहासाचा शेवट पूर्ण होत होत नाही ही वस्तुस्थिती आहे. औरंगजेबाचा मृत्यूपत्राची शेवटची म्हणजे 12 वी सूचना ही शिवाजी महाराजांच्या संबंधित होती. म्हणजे औरंगजेबाचा मृत्यूही शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच झाला. यातून शिवाजी महाराज ही काय जादू होती याची प्रचीती येते.