साधेपणा... ना सरकारी गाडी, ना जंगी स्वागत; पदभार सोडल्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पत्नीसह पायीच निघाले
Sunil Kendrekar Retired : यावेळी त्यांनी कुठल्याही शासकीय गाडीचा वापर न करता साधेपणाने आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते शासकीय निवासस्थान गाठले.
Sunil Kendrekar Retired : धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेले मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोमवारी पदभार सोडला. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्याकडे केंद्रेकर यांनी पदभार सोपवला. दरम्यान, यावेळी त्यांनी कुठल्याही शासकीय गाडीचा वापर न करता साधेपणाने आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते शासकीय निवास्थान गाठले. दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत तीन आयपीएस अधिकारी आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी देखील पायी प्रवास केला.
अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ म्हटलं की, डोळ्यांसमोर जंगी स्वागत करत त्यांना दिल्या जाणाऱ्या निरोपाचे चित्र पाहायला मिळतं. मात्र याउलट चित्र सुनील केंद्रेकर यांच्या निरोपावेळी पाहायला मिळाले. आपल्या साधेपणामुळे ओळखल्या जाणाऱ्या केंद्रेकरांचा साधेपणा नोकरीच्या शेवटच्या दिवशी देखील दिसून आला. स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केल्यानंतर सोमवारी त्यांनी पदभार सोडला. दरम्यान, यावेळी निरोपाचा कोणताही जंगी कार्यक्रम पाहायला मिळाला नाही. पत्नीसह आलेल्या केंद्रेकरांनी अगदी साधेपणाने शासकीय सेवेतून निरोप घेतला. तसेच विभागीय आयुक्त पदाचा कारभार जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्याकडे सोपवला. त्यानंतर त्यांनी शासकीय वाहनातून जाण्यास नकार देत, आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते गुलशन महल असा प्रवास केला.
गेल्या 34 वर्षांत पत्नी पहिल्यांदाच कार्यालयात आल्या
आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे चर्चेत राहणारे सुनील केंद्रेकरांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, सोमवारी त्यांनी विभागीय कार्यालयात शासकीय सेवेतून निरोप घेतला. यावेळी त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या. विशेष म्हणजे, केंद्रेकरांच्या पत्नी 34 वर्षात पहिल्यांदाच कार्यालयात सोबत आल्या. यापूर्वी त्या कधीही विभागीय आयुक्तालयात आल्या नव्हत्या.
निरोप घेण्यापूर्वी दिली बढती प्रस्तावाला मंजुरी
मराठवाड्यातील दीडशेहून अधिक अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात बढती मिळणार आहे. कारण पात्र असलेल्या 159 कर्मचाऱ्यांची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाने शासन मान्यतेसाठी सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्त होण्यापूर्वी माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पदोन्नती समितीची बैठक झाली. यात विभागातील अव्वल कारकून, मंडळ अधिकारी इत्यादी. संवर्गातील 159 कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात बढ़ती देण्याबाबतचा निर्णय झाला. पात्र 156 कर्मचाऱ्यांना बढती देण्यासंदर्भात शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दहा वर्षात एवढ्या प्रमाणात पदोन्नतीबाबत कार्यवाही झाली नसल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :