IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांना बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Ambadas Danve : केंद्रेकरांनी घेतलेल्या निर्णयाचा सरकारमधील लोकांना त्रास झाला, त्यामुळे राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले.
Chhatrapati Sambhaji Nagar News : धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जाणाऱ्या सुनील केंद्रेकर यांनी (Sunil Kendrekar) स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती का घेतली यावरुन राजकीय, प्रशासकीय वर्तुळ तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. तर यावरुन आता राजकीय आरोप देखील सुरु झाले आहेत. तर केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नसून त्यासाठी त्यांना भाग पाडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.
आतापर्यंत आपल्या कामातून अनेकांना धक्के देणाऱ्या धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सुनील केंद्रेकरांनी घेतलेल्या एका निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. शासकीय सेवेचे दोन वर्षे बाकी असतानाच केंद्रेकरांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शासनाने त्यांचा अर्ज मंजूर देखील केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नसून त्यासाठी त्यांना भाग पाडण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. "सुनील केंद्रेकर मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी एक सर्व्हे केला होता, तसेच त्याबाबत सरकारला काही सूचना केल्या. याच्या बातम्या देखील आल्या होत्या. मात्र याचा सरकारमधील लोकांना त्रास झाला, त्यामुळे केंद्रेकरांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. केंद्रेकर स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला. ही स्वेच्छानिवृत्ती नाही त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला असेल," असेही दानवे म्हणाले.
केंद्रेकरांनी शेतकऱ्यांच्याबाबत केलेल्या सर्व्हेमध्ये नेमकं काय होते?
- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकर यांनी मराठवाड्यात एक सर्व्हे केला होता.
- पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला होता.
- सर्व्हे करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले.
- यात एकूण 104 प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली.
- या सर्व्हेनंतर शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष काढला गेला
- याबाबतचा अहवाल सरकारला देण्यात आला होता.
मराठवाड्यातील दुष्काळ रोखण्यासाठी ऊस लागवडीवर बंदी आणावी तसेच पेरण्यांपूर्वी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत द्यावी या सरकारला पाठवलेल्या शिफारशी तसेच इतर धडाकेबाज निर्णयांमुळे केंद्रेकर चर्चेत राहिले. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका असे त्यांनी मराठवाड्यातील अधिकाऱ्यांना सुनावलेले खडेबोल असो, की आठवडी बाजारात बायकोसोबत सामन्य व्यक्तीप्रमाणे त्यांनी बाजार केल्याची घटना असो, केंद्रेकरांच्या कामाच्या पद्धतीने सर्वसामन्यांमध्ये नेहमीच कुतहूल असायचे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. पण त्यांच्या बदलीवरुन अनेक चर्चांना देखील उधाण आले आहेत.
केंद्रेकरांच्या निर्णयावरुन चर्चा...
- यापूर्वी ज्यावेळी आम आदमी पार्टीने समाजातील वेगळ्या लोकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस सुद्धा सुनील केंद्रेकर यांना आपने उमेदवारी संदर्भात विचारले होते.
- सुनील केंद्रेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते कोणत्या क्षेत्रात काम करणार याविषयी उलट सुलट चर्चा सुरु आहे.
- गेल्या काही दिवसांपासून सुनील केंद्रेकर हे एखाद्या राजकीय पक्षाकडून उमेदवारी लढवणार असल्याची चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये आहे.
- सुनील केंद्रेकर यांनी वेगवेगळ्या विभागात काम केला आहे. त्यातील बीड जिल्हाधिकारी म्हणून अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांचे टोकाचे मतभेद समोर आले होते. यातून त्यांच्या बदली करण्यासंदर्भात सुद्धा राजकीय नेत्यांनी पावलं उचलली होती. त्यानंतर मात्र केंद्रेकरांची कारकीर्द फारशी वादग्रस्त ठरली नाही.
केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती का घेतली यावर बोलण्यास त्यांनी सध्या तरी नकार दिला आहे. पण त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयानंतर ते कोणत्या क्षेत्रात जाणार हे पाहणं देखील तेवढच महत्वाचे ठरणार आहे. तर केंद्रेकर यांचा आगामी निर्णय अनेकांना धक्का देणारा असणार असल्याची देखील चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: