Kirit Somaiya : चला, अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडूयात; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
Kirit Somaiyya : अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीला येण्याचे आवाहन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. या मुद्यावरून आता शिवसेना आणि भाजपचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Kirit Somaiyya : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी यावे असे आवाहनचं सोमय्या यांनी ट्वीटरवर केले आहे. सोमय्या यांच्या या ट्वीटनंतर भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे म्हटले जात आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटले, लोकायुक्त यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे मान्य केले. या रिसोर्टच्या बांधकामाला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही सरकारने कारवाई केली आहे. मात्र, रिसॉर्टवरील कारवाईबाबत हालचाली दिसत नाही. गरिबाने अनधिकृत बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई होते, मग, अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट का कारवाई होत नाही असा सवालही त्यांनी केला. 26 मार्च रोजी सकाळी आम्ही दुपारी 3 वाजता दापोली येथे जाणार असून रिसॉर्ट तोडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या पैशातून परब यांनी या रिसॉर्टचे बांधकाम केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आमची कृती ही जनआंदोलन असून सत्याग्रह आहे. त्यामुळे कायदा हातात घेणार नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
26 March Chalo Dapoli
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 19, 2022
Demolish Anil Parab's Resort
२६ मार्च - चला दापोली
अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया @BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/p2UIxCneem
दापोली येथील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्ट तोडून अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याकडून देण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर सतत त्याचा पाठपुरावा केला होता.
रिसॉर्टशी संबंध नाही: अनिल परब
दरम्यान, या रिसॉर्टशी माझा संबंध नाही. याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्याचे अनिल परब यांनी याआधीच स्पष्ट केले होते. किरीट सोमय्यांना माझी माफी मागावी लागेल किंवा शंभर कोटी द्यावे लागतील. मला दिलेल्या नोटीसीला मी उत्तर दिले आहे. सरकारने ज्यांच्या नावावर रिसॉर्ट आहे त्यांना नोटीस दिली आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
