(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajesh Tope : शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात; राजेश टोपे यांचा आरोप
Aurangabad : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राज्याचे मंत्री राजेश टोपे यांनी हा आरोप केला आहे.
औरंगाबाद: राज्यात एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीतला स्थानिक संघर्ष समोर आला आहे. शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात असा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
राज्यातील सत्तेत सोबत असतानाही सत्तेचा वाटा मिळत नसून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सतत केला जातोय. पण यातच आता राष्ट्रवादीची भर पडली असून, शिवसेना मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात असल्याचा आरोप खुद्द राष्ट्रवादीच्या मंत्र्याने केला आहे. राजेश टोपेंचा रोख हा रोहयो मंत्री भामरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे असल्याचं स्पष्ट आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची स्थापन केली. पण आता त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळत नसून, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
राजेश टोपे यांच्या आरोपाला आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. तर टोपे यांचे आरोप खोटे असल्याचं रोहयो मंत्री भुमरे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष प्रायव्हेट कॅरियर झाला असून, त्यांना फोडण्याची गरज काय असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे ग्राउंडवर मात्र काही केल्या दोन पक्षाचे नेते कार्यकर्ते एकत्र यायला तयार नाहीत. त्यामुळे या दोन पक्षांच्या युतीचे भवितव्य काय असेल याचे उत्तर काळच देईल. पण महाविकास आघाडी जरी झाली असली तरी प्रत्यक्ष मात्र कार्यकर्ता पातळीवर महाविकास आघाडीचे बीज अजून रुजलेली दिसत नाही हेच खरं.
महत्त्वाच्या बातम्या:
- गुंडांना हाताशी धरुन भाजपचं पोल खोल अभियान दाबण्याचा प्रयत्न, रथ तोडफोडप्रकरणी दरेकरांचा आरोप
- मंत्री यशोमती ठाकूरच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड, अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप
- Bala Nandgaonkar : अयोध्या दौरा, भोंगा वाद ते अक्षय्य तृतीयेला महाआरती, मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी काय दिले आदेश?