Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज भालेगांव मुक्कामी; तर माता रूक्मिणीच्या पालखीचा कुऱ्हा येथे मुक्काम
Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ठिकठिकाणांहून पालखीचे प्रस्थान झाले आहे. संत मुक्ताई आणि माता रूक्मिणीचा आज कोणत्या ठिकाणी मुक्काम असणार आहे हे जाणून घ्या.
Ashadhi Wari 2022 : जून महिना सुरु झाला आहे. जून महिना आणि आषाढी वारीचं जणू समीकरणच आहे. नुकताच 3 जूनला (काल) संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. दोन वर्ष कोरोना संकटामुळे आषाढी वारी सोहळयात खंड पडला होता. मात्र, यंदा कोरोनाचे संकट दूर झाल्यावर पुन्हा एकदा वारकऱ्यांना पालखी सोहळ्यासोबत पंढरीची वाट चालायचे वेध लागले आहेत. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? तसेच गजानन महाराज. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा कधी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
संत मुक्ताईच्या पालखीचा आज भालेगांवला (रण) येथे मुक्काम
यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज दुपारी रूईखेडा येथे पालखीचे प्रस्थान असणार आहे. तर, भालेगांव (रण) या ठिकाणी रात्री पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच रविवारी 5 जून रोजी ही पालखी मलकापूर येथे प्रस्थान करेल, तर रात्री मलकापूर याच ठिकाणी रात्रभर पालखीचा मुक्काम असणार आहे.
माता रूक्मिणीच्या पालखीचा आज कुऱ्हा, ता. तिवसा येथे मुक्काम
माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. तर रात्री तरोडा, ता. तिवसा या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता. आज 4 जून रोजी ही पालखी सकाळी तरोडा तिवसा येथून निघाली. तर, पालखीचा आज रात्रीचा मुक्काम कुऱ्हा, ता. तिवसा येथे असणार आहे. उद्या म्हणजेच 5 जून रोजी ही पालखी कुऱ्हा येथून प्रस्थान करणार आहे. तर रात्री मार्डी, ता. तिवसा येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
आगामी पालखी सोहळे :
6 जून : गजानन महाराज पालखी सोहळा
या वर्षीच्या आषाढीनिमित्त होणाऱ्या पंढरपूर यात्रेसाठी शेगाव येथील गजानन महाराजांची पालखी 6 जूनला प्रस्थान करणार आहे. कोरोना काळामुळे मागील दोन वर्ष पालखी सोहळा रद्द झाला होता. माक्ष, यंदा हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वारीचे यंदाचे हे 53 वे वर्ष आहे.
20 जून : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थांनने या सोहळ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडतोय. यंदा हा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
21 जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
कोरोनामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या (Ashadhi Wari) सोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोना आवाक्यात आला आहे. म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. वारकरी ही तशा तयारीत आहेत. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :