(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhijit Patil : पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
लोकसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटील या महायुतीसोबत होते. त्यानंतर त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारकडून 280 कोटी रुपयांचा कर्ज देण्यात आलं होतं. मात्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
Madha Vidhan Sabha : सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभेसाठी इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी जोरदार सुरू आहे. या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच या मतदारसंघातील इच्छुकांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुद्धा सुरु आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज (11 ऑक्टोबर) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेत उमेदवारीसाठी साकडे घातल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत पाटील माढा विधानसभेसाठी तयारी करत आहेत. यापूर्वी त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अभिजीत पाटील महायुतीचे साथ सोडणार का अशीच चर्चा सुरू आहे.
पवारांसोबत भेटीगाठीचा सिलसिला सुरू
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटील महायुतीसोबत होते. त्यानंतर त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारकडून 280 कोटी रुपयांचा कर्ज देण्यात आलं होतं. मात्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचा पवारांसोबत भेटीगाठीचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे अभिजीत पाटील महायुतीला रामराम करणार का? याकडे सुद्धा लक्ष आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच माढाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी घोषणा करताना आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुलाला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात असल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यांनी सुद्धा शरद पवारांकडे मुलासाठी उमेदवारी मागणार असल्याचं म्हटलं होतं. जर उमेदवारी मिळाल नाही तर अपक्ष लढू असेही त्यांनी म्हटलं होतं.
माढ्यामध्ये इच्छूकांची संख्या वाढली
काही दिवसांपूर्वी बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. माढा विधानसभा मतदारसंघात शिंदे बंधूंच्या विरोधात अभिजीत पाटील आक्रमक आहेत. दुसरीकडे, भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी झाली आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाला कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष असेल. माढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची उमेदवारी शरद पवार निश्चित करतील अशी चर्चा असताना आता थेट मोहिते पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरायची तयारी करू लागल्याने पवारांसमोरही नवीन ट्विस्ट उभा राहिला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील कुटुंबातील एकाने उभारावे ही जनतेची मागणी असून त्यासाठीचा दबाव वाढू लागल्याचे आज शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या