6th September In History : 1965 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्याची लाहोरपर्यंत धडक; आज इतिहासात...
6th September In History Today In History : आजच्या दिवशी भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत पाकिस्तानच्या भूभागावर तिरंगा फडकावला.
6th September In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. भारतीय सैन्याने 1965 च्या युद्धात पाकिस्तानचे 'ऑपरेशन जिब्राल्टर' मोडीत काढले. त्यानंतर पाकिस्तानने 'ऑपरेशन ग्रँड स्लॅम'ची सुरूवात केली. त्यालाही भारतीय सैन्याने मोडीत काढले. अखेर भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार धडा शिकवण्याचा निर्धार केला. आजच्या दिवशी भारतीय सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत पाकिस्तानच्या भूभागावर तिरंगा फडकावला. त्याशिवाय, आजचा दिवस चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथ गोखले आणि चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्मदिन आहे.
1889: सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू स्वातंत्र्यसेनानी बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म
शरदचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बॅरिस्टर होते. ते सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू होते. ते काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि बंगाल विधानसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते. शरदचंद्र बोस यांचा जन्म 6 सप्टेंबर 1889 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे कटकमधील नावाजलेल्या वकीलांपैकी एक होते. शरदचंद्र बोस यांचे शिक्षण कटक आणि कोलकातामध्ये पूर्ण झाले. पुढे त्यांनी इंग्लंडमधून कायद्याचे शिक्षण घेतले आणि मायदेशी परतल्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयातून प्रॅक्टिस सुरू केली. बंगालच्या फाळणीला त्यांचा विरोध होता.
1901 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म
कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम बाल स्त्री-कलाकार होत्या. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला. या दोघींनी एकाच वेळी आणि एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या मूकपटात काम केले.
1929: चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म
भारतीय चित्रपट निर्माते आणि धर्मा प्रोडक्शनचे संस्थापक यश जोहर यांचा आज जन्मदिन. चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांचे ते वडील होत. अमृतसर येथे जन्म झालेल्या यश जोहर यांनी आपल्या आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत सुरुवातीच्या काळात यश जोहर हे फोटोग्राफर म्हणून रुजू झाले होते. पुढे अभिनेत्री मधुबाला यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून प्रोडक्शन हाऊसमध्ये रूजू झाले. सुनील दत्त, देव आनंद यांच्या प्रोडक्शन हाऊससाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. 1976 मध्ये त्यांनी स्वत: च्या धर्मा प्रोडक्शनची सुरुवात केली. या बॅनर अंतर्गत त्यांनी दोस्ताना चित्रपटाची निर्मिती केली. याचे दिग्दर्शन राज खोसला यांनी केले होते. त्यानंतर दुनिया, अग्निपथ, गुमराह, डुप्लीकेट आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. 1998 मध्ये त्यांचा मुलगा करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले. कल हो ना हो हा त्यांचा सहभाग असलेला शेवटचा चित्रपट ठरला.
1965 : पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली
1965 मध्ये पाकिस्तानने भारताविरोधात ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले होते. मात्र, यामध्ये त्यांना मात मिळाल्यानंतर पाकिस्ताने ऑपरेशन ग्रँड स्लॅमची सुरूवात केली. त्यानुसार, जम्मू-काश्मीरमधील अखनूर शहरात ताबा मिळवण्याचा डाव पाकिस्तानी सैन्याचा होता. 1 सप्टेंबर 1965 रोजी पाकिस्तानने जोरदार हल्ला केला. मात्र, पाकिस्तानचा हा डाव भारतीय सैन्याने उधळून लावला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्याविरोधात प्रत्युत्तर कारवाई सुरू केली.
भारतीय लष्कराने इछोगिल कालव्याच्या पूर्व भागात असलेला पाकिस्तानचा सर्व भाग ताब्यात घेण्याची योजना आखली. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी इंडियन इलेव्हन कोअरच्या तीन तुकडींना देण्यात आली होती. उत्तरेकडील पठाणकोटपासून दक्षिणेला सुरतगडपर्यंतच्या भागावर भारताचा ध्वज फडकवण्याची योजना आखण्यात आली. हा संपूर्ण परिसर तीन भागात विभागला गेला. 15 डिव्हिजनला जीटी रोड अक्षांसह उत्तरेकडील सेक्टर, 7 डिव्हिजनला खलरा-बकरी मध्य सेक्टर आणि 4 माउंटन डिव्हिजनला खेमकरण-कसूर दक्षिणेकडील क्षेत्र काबीज करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
भारतीय सैन्य लाहोरमध्ये दाखल
6 सप्टेंबर 1965 रोजी पहाटे 4 वाजता भारतीय सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. कारवाई सुरू होताच भारतीय लष्कराने ध्वज फडकवण्यास सुरुवात केली. काही वेळातच डोगराईवर भारताचा ध्वज फडकावला जाऊ लागला. काही वेळातच बर्की गावाजवळील इछोगिल कालवा पार करण्यात भारतीय लष्कराला यश आले. भारतीय सैन्याने इछोगिल कालव्याच्या पलीकडे एक पुलाची स्थापना केली आणि भारतीय सैन्य लाहोरच्या बाहेरील बातापूरपर्यंत पोहोचू शकले. आता लाहोरचा विमानतळ आणि भारतीय लष्कर यांच्यात फार कमी अंतर शिल्लक होतं.
उत्तरेकडील भागाप्रमाणे मध्यवर्ती भागातही भारतीय लष्कराने आपली विजयी पताका फडकावली. येथे भारतीय सैन्याच्या 7 व्या पायदळ तुकडीने पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून खलरा-बर्की धुरीवर ताबा मिळवला. बर्कीची लढाई भारतीय लष्करासाठी सोपी नव्हती, असे म्हटले जाते. हा भाग पाकिस्तानी लष्कराने अतिशय मजबूत बंकरद्वारे संरक्षित केला होता. मात्र, भारतीय लष्कराच्या चौथ्या शीख रेजिमेंटच्या शूर सैनिकांनी सर्व प्रतिकार मोडून काढला आणि 10 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भारतीय तिरंगा बिरकीमध्ये फडकण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे या भारतीय सैन्य दलाने 11 सप्टेंबर 1965 रोजी आपली मोहीम फत्ते केली.
ऑपरेशन ग्रँड स्लॅमला भारतीय सैन्य इतक्या जोरदारपणे प्रत्युत्तर देईल असे पाकिस्तान सैन्याला वाटले नव्हते. भारतीय सैन्याच्या कारवाईचा धसका पाकिस्तानच्या सैन्याने घेतला. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये आणखी शिरकाव करू नये यासाठी पाकिस्तानी सैन्याने काही ठिकाणी पूल, रस्ते उडवून लावले.
इतर महत्त्वाच्या घटना :
1766 : इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म
1892 : ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार प्राप्त सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म
1921 : बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचा जन्म
1923 : युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म
1929 : भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म
1972 : जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खान यांचे निधन