Video : अमित शाहांना महाराष्ट्रातून मराठा जात संपवायचीय; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
अमित शाह यांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं, तुमची अपेक्षा काय होती त्यांच्याकडून, असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला होता.
जालना : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न जटील व गुंतागुंतीचा बनला असून भाजपच्या अधिवेशनातही या प्रश्नावरुन खलबतं झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठा आरक्षणाच्या (maratha Reservation) मुद्द्यावर भाष्य केलं. त्यानंतर, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा-ओबीसी आरक्षणावर चर्चा केलीय. मात्र, अमित शाह यांनी आपल्या भाषणातून शरद पवार यांच्यावर टीका करताना मराठा आरक्षणाचाही संदर्भ दिला होता. आता, अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्यासंदर्भात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, बोलताना ते मोठे लोकं आहेत, ते कधी लक्ष घालणार, ते मोठे लोक आहेत, ते गरिबांच्या ढुंगणावर लाथ मारतात, अशा शब्दात अमित शाह यांच्या दौऱ्यावर भाष्य केलं. तसेच, त्यांना महाराष्ट्रातून मराठा (maratha) जात संपवायची आहे, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केलाय.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती हळू हळू खालावत आहे. आज सकाळीच उपोषणस्थळी वैद्यकीय पथक पोहोचले होते, मराठा आरक्षणासह सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य करताना त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अमित शाह यांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं, तुमची अपेक्षा काय होती त्यांच्याकडून, असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, ते कधी लक्ष घालणार ,ते मोठे लोक आहेत, त्यांना केवळ सत्ता स्थापन करेपर्यंत गरिबांची गरज असते. एकदा सत्ता स्थापन केली की, ते गरिबांच्या ढुंगणावर लाथ मारतात, मोदी शिर्डीत आले होते तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा होती. पण, अद्यापही त्यांचा ब्र शब्द नाही. त्यांचा चेहराच फक्त माणसाचा आहे, गरिबांचे मुडदे पाडणारे हे लोक आहेत, आतून कपटी लोकं आहेत ते अशा शब्दात मनोज जरांगे यांनी अमित शाहंवर हल्लाबोल केला.
त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत, महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे, ती संपवायचीय. गुजरातमध्ये पटेल आहे, यादव, गुज्जर, जाट, मुसलमान, दलित या मोठ्या जाती त्यांना संपवायच्या आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. मात्र, मोठाल्या जाती एकत्र आल्यावर काय होतं, हे त्यांना माहित नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
व्हिडिओमध्ये 5.30 मिनिटांपासून पुढे पाहाता येईल
येवल्यात उपोषण करणार, जरांगेंचा इशारा
आमच्याकडे रॅली काढून छगन भुजबळ 100 टक्के दंगली घडवून आणणार. मग, मी नाशिकमधील येवल्यात उपोषण सुरू केल्यावर, तुला किती वाईट वाटेल, माझ्या आता हे डोक्यातच आहे. तीन तीन वेळा उपोषण रॅली असतात का, तुझा जिल्हा मोकळा आहे, तू राजकारणासाठी मोकळा आहे, मी उपोषण येवल्यात, नाशिक कुठेही करू शकतो, तिकडे का करू शकत नाही, असा सवाल जरांगे यांनी विचारला. तसेच, माझं इकडे सुरू असलेलं उपोषण मी येवल्यात करू शकतो, थांब मी आता तिकडेच येतो, असा इशाराच जरांगेंनी भुजबळ यांना दिला आहे.
हेही वाचा
शरद पवार अन् मुख्यमंत्री शिंदेंची भेट नेमकी कशासाठी?; जाणून घ्या महिनाभरातील क्रोनॉलॉजी