केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल 2019-20 सादर, महाराष्ट्रातील विद्यापीठात विद्यार्थी नोंदणी संख्या सर्वाधिक
सर्वेक्षणानुसार, 49,348 परदेशातील विद्यार्थी हे भारतात शिक्षण घेत आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे शेजारील देशातील आहेत.
मुंबई : आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल 2019-20 सादर करण्यात आला. उच्च शिक्षणाबाबत अधिकृत माहिती व सर्व प्रकारचा महत्वाचा डेटा असलेला देशातील उच्च शिक्षणविषयक हा 10 अहवाल सादर करण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकार यांना उच्च शिक्षणाबाबत योजना तसेच विविध प्रकारच्या नियोजनसाठी हा अहवाल महत्वपूर्ण ठरतो. देशातील तसेच देशातल्या विविध राज्यातील उच्च शिक्षणाबाबतची सद्यस्थिती व माहिती तसेच होत असलेली प्रगती या सगळ्याचा समावेश या अहवालामध्ये आहे.
उच्च शिक्षणविषयक अखिल भारतीय सर्वेक्षण अहवाल 2019-20 महत्वाचे मुद्दे
उच्च शिक्षणात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांनीचा टक्का वाढला
उच्च शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक वर्ष 2019-20 मध्ये 1.01 होता,वर्ष 2018-19 मध्ये तो 1.00 होता. म्हणजेच सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेण्यात 100 विद्यार्थ्यांमागे, 101 विद्यार्थिनी आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थिनींच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षात 18.2 टक्के वाढ झाली आहे.
राष्ट्रीय पातळीवर महत्व असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये वाढ
राष्ट्रीय पातळीवर महत्व असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये वाढ झाल्याचे सुद्धा या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. 2015 साली ज्या 75 संस्था होत्या त्या संस्था 2020 साली वाढून 135 झाल्या आहेत.
पीएचडी अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ
शिवाय, पीएचडी अध्ययन असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मोठी वाढ मागील 5 वर्षात पाहायला मिळतीये. 2014-15 साली 1 लाख 17 हजार विद्यार्थी पीएचडी अध्ययन करत होते तर ही संख्या 2019-20 मध्ये 2 लाख 3 हजार एवढी झाली.
परदेशातील देशात शिक्षण घेणारे विद्यार्थी
सर्वेक्षणानुसार, 49,348 परदेशातील विद्यार्थी हे भारतात शिक्षण घेत आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे शेजारील देशातील आहेत. उत्तर प्रदेशात 7788 महाविद्यालये असून प्रती एक लाख लोकसंख्येमागे 31 महाविद्यालये आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र याबाबत दुसऱ्या क्रमांकावर असून, इथे 4494 महाविद्यालये आणि प्रती एक लाख लोकसंख्येमागे 34 महाविद्यालये आहेत.
इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात विद्यापीठात विद्यार्थी नोंदणी संख्या देशात सर्वाधिक
विद्यार्थी पटसंख्येतील राज्यांच्या वाट्यानुसार बघायचे झाल्यास, महाराष्ट्रात विद्यापीठात विद्यार्थी नोंदणी संख्या देशात सर्वाधिक (यात विविध उपकेंद्रे आणि विभागांचाही समावेश) म्हणजेच, 9,67,034 इतकी आहे.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम
देशात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी 14.2 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात ही संख्या 2.04 लाख विद्यार्थी इतकी असून महाराष्ट्र याबाबत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 3 लाख विद्यार्थ्यांसह तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर आहे. AISHE च्या पोर्टलवर 3805 पॉलिटेक्निक्सची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच 746 पॉलिटेक्निक्स महाराष्ट्रात आहेत.
AISHE च्या पोर्टलवर अध्यापक प्रशिक्षण संस्था
AISHE च्या पोर्टलवर अध्यापक प्रशिक्षण संस्थांची एकूण संख्या 3849 इतकी आहे, यापैकी पहिल्या पाच राज्यांत एकूण संस्थापैकी 55.4 टक्के विद्यार्थी आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 37,817 विद्यार्थी आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात 32,620 विद्यार्थी आहेत.