अकोला जिल्ह्यातील अकोटमधल्या दरोडा 'मिस्ट्री'ची उकल
अकोट शहरातील या दरोड्यामूळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. 31 ऑगस्टला भरदुपारी व्यापारी याश्विन शेजपाल यांच्या घरी कोरोना लसीकरण पथक असल्याचे सांगत दरोडा टाकला होता.
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. 31 ऑगस्टला दिवसाढवळ्या दुपारी तीन वाजता व्यापारी याश्विन शेजपाल यांच्या घरी दरोड्याची ही घटना घडली होती. अकोट पोलिसांनी अवघ्या 72 तासांत या दरोड्याचा छडा लावला आहे. आज दरोड्यात सहभागी सात जणांना आज पोलिसांनी अटक केलीये. अकोट पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सर्व आरोपी हे एकाच कुटूंबातील आहेय. आरोपींमधील एक महिला ही शेजपाल यांच्याकडे पुर्वी कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आलाये.
अकोट शहरातील या दरोड्यामूळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शेजपाल कुटूंबातील दोन जेष्ठ नागरिकांसह एक छोटी मुलगी जखमी झाली होती. अटकेतील आरोपी कुटुंबाची आजपर्यंत कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यांनी दरोडा टाकण्यामागचं नेमकं कारण काय?, याचा तपास करण्याचं मोठं आव्हान अकोट पोलिसांसमोर असणार आहे.
चोरायला गेलेत 'घबाड' अन हाती आले फक्त 29 हजार
31 ऑगस्टच्या एका घटनेनं अकोला पोलिसांना मोठं आव्हान दिलं होतं. घटना घडली होती जिल्ह्यातील अतिशय 'जागृत' अन 'जीवंत' शहर अशी ओळख असलेल्या अकोटमध्ये. अकोट शहरातील बुधवारवेस भारतातील व्यापारी याश्विन शेजपाल यांच्या घरी दिवसाढवळ्या दुपारी 3 वाजता दरोड्याचा हा प्रकार घडला होता. त्या दिवशी याश्विन हे पत्नी आणि मुलासह बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. तर घरी वृद्ध वडील अमृतलाल, आई इंदूबेन आणि बारा वर्षीय मुलगी देलिशा हजर होतेय. याचवेळी दोन अनोळखी पुरुष आणि दोन महिला असे चारजण तोंडाला स्कार्फ बांधून आपण कोरोना लस घेतलेली आहे का?, याबाबत विचारपूस करू लागलेत. आम्ही सर्वे करत आहोत असं ते सांगत होते. यावेळी वृद्ध इंदूबेन यांनी त्यांना ओळखपत्र मागितले. त्यावेळी या चौघांनीही घरात जबरदस्तीने घुसत या तिघांना मारहाण सुरू केली. दरोडेखोरांनी या तिघांना जबर मारहाण करुन तोडांत कापडी बोळे कोंबून दोरानं एका खालीत बांधून ठेवले होते. घरातील वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल, त्यांची पत्नी इंदुबेन सेजपाल, नात देलिशा यांना मारहाण करण्यात आली होती. दरम्यान, आरडाओरडीमुळे दरोडेखोर बाहेरून पळून गेलेय. यात दरोडेखोरांच्या हाती फक्त 27 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल आणि 2700 रूपये रोख असा ऐवज लागला होता.
अकोट पोलिसांनी 72 तासांत शोधले आरोपी :
31 ऑगस्टला दिवसाढवळ्या घडलेल्या या दरोड्याच्या प्रकारामुळे अकोट पोलिसांची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगली गेली होती. या घटनेनंतर पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी अकोटमध्ये भेट देत अकोट पोलिसांचे कान उपटले होते. आरोपींच्या शोधासाठी चार पथकं गठीत करण्यात आली होती. अकोट पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. गुप्त माहितीनुसार आरोपी हे अकोटमधील असल्याचं निष्पन्न झालं. आज या सर्व आरोपींच्या मुसक्या अकोटमधूनच आवळण्यात आल्यात अकोट पोलिसांनी गुन्हेगारांना शोधण्याचं आव्हान अवघ्या 72 तासांतच पेलत सात आरोपींना अटक केली आहे. 'देर आये मगर दुरूस्त आये' असं म्हणत अकोट पोलिसांच्या या कारवाईचं कौतूक होत आहे. आज अटक केलेले सर्व आरोपी हे अकोटमध्येच राहणारे आहेत. यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. आरोपींमध्ये खालील लोकांचा समावेश आहे.
1) विठ्ठल नामदेव टवरे, वय 50 वर्ष, शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट
2) वैशाली विठ्ठल टवरे वय 45 वर्ष, शिवाजीनगर, मोठे बारगण, अकोट
3)संगम गणेशराव ठाकरे वय 32 वर्षे
4)सागर गणेशराव ठाकरे वय 30 वर्ष
5)अमृता संगम ठाकरे वय 25 वर्ष, रा. : येवदा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती हल्ली मुक्काम मुक्ताई संकुल, कबुतरी मैदान ,अकोट
6)सीमा विजय निंबोकार, वय 35 वर्षे, रा. नर्सिंग कॉलनी अकोट.
दरोड्यामागचा नेमका उद्देश कोणता? :
या दरोड्यातील एक महिला आरोपी काही दिवसांपूर्वी शेजपाल यांच्याकडे कामाला असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. तिच्याच संपर्कातून तिच्या घरातील आणि नात्यातील मंडळींना सोबत घेत हा दरोड्याचा कट शिजल्याचं बोललं जात आहे. अटकेतील आरोपी कुटूंबाची आजपर्यंत कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्यांनी दरोडा टाकण्यामागचं नेमकं कारण काय?, याचा तपास करण्याचं मोठं आव्हान अकोट पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे या कुटुबानं हे गुन्हेगारीकडे जाणारं पाऊल नेमकं का उचललं?, याच उत्तर अकोट पोलिसांना शोधावं लागणार आहे.