अकोला ठरलं महाराष्ट्रातलं सर्वाधिक उष्ण शहर; स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद
अकोल्याचं तापमान या शतकातलं दुसरं सर्वाधिक तापमान होतं. त्यामुळे अकोला आता कोरोना रुग्णांसोबतच उष्णतेचंही 'हॉटस्पॉट' ठरलं आहे. गेल्या सहा वर्षांत अकोला अधिक तापमानामुळे जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आलं आहे.
अकोला : राज्यातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून काल अकोल्याची नोंद झाली. काल अकोल्याचा पारा 47.4 अंशांवर होता. अकोला काल देशातील दुसरं तर जगातील चौथं उष्ण शहर ठरलं आहे. अकोल्याचं कालचं तापमान स्वातंत्र्योत्तर काळातलं सर्वाधिक तापमान ठरलं आहे. सध्याच्या तापमानामुळे अकोल्यातील रस्त्यांवर कुणीच दिसत नाही. सध्या कोरोनामुळे पाच वाजेपर्यंत सार्वजनिक व्यवहारासाठी परवानगी असतांना अकोल्यातले रस्ते दुपारनंतर उन्हामुळे निर्मनुष्य दिसतात.
कालचं अकोल्याचं तापमान या शतकातलं दुसरं सर्वाधिक तापमान होतं. त्यामुळे अकोला आता कोरोना रुग्णांसोबतच उष्णतेचंही 'हॉटस्पॉट' ठरलं आहे. अकोल्यात मंगळवारी दुपारपर्यंत कोरोनाच्या 428 रूग्णांची नोंद झाली आहे.
अकोलाकरांना सध्या मोठमोठे आकडे ऐकण्याची जणू सवयच झाली आहे. मग ते आकडे वाढत्या कोरोना रूग्णांचे असो की मग अक्षरश: भाजून काढणाऱ्या उन्हाची. अकोल्यात कोरोना रुग्णांनी चारशेंचा टप्पा पार केला आहे. तर तब्बल 26 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर सोमवारी अकोल्यात उन्हाची पारा गेलाय तब्बल 47. 4 अंशांवर. त्यामुळे कोरोना रुग्ण आणि तापमानामध्ये अकोल्यात जणू आकड्यांची शर्यत लागल्याचं वातावरण आहे.
स्वातंत्र्यानंतरचं हे अकोल्यातलं सर्वाधिक तापमान
सोमवारचं 47.4 अंश सेल्सिअस हे अकोल्याचं स्वातंत्र्यानंतरचं सर्वाधिक तापमान ठरलं आहे. अकोल्याच्या इतिहासातील सर्वाधिक तापमानाची नोंद देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतांनाच्या उन्हाळ्यात नोंदवली गेली होती. 22 मे 1947 रोजी अकोल्यात 47.8 अंश सेल्सिअस एव्हढ्या तापमानाची नोंद झाली होती. हा तापमान उच्चाकांचा विक्रम अद्याप अबाधित आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या उष्णतेच्या लाटेचा इशारा बघता आता हा विक्रम मोडतो की काय?, अशी भिती अकोलाकरांमध्ये निर्माण झाली आहे.
सोमवारी जगातील पहिल्या चार उष्ण शहरांत अकोला
कालच्या 47.4 एवढ्या तापमानामुळे अकोला महाराष्ट्रातल पहिलं, देशातलं दुसरं तर जगातलं चौथं उष्ण उष्ण शहर ठरलं आहे. काल राजस्थानातील चुरू हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर होतं. काल तेथील तापमान 47.5 एवढं नोंदवलं गेलं आहे. तर जगाचा विचार केला तर काल इराकमधील तुझ शहर हे सर्वाधिक तापमानाचं शहर ठरलं. तेथे 50.5 अंश सेल्सिअस एव्हढं तापमान नोंदल गेलं. तर पाकिस्तानातील जाकोबाबाद शहरात काल 50 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अकोला शहर होतं.
अधिक तापमानामुळे अकोला जागतिक स्तरावर प्रकाश झोतात
गेल्या सहा वर्षांत अकोला अधिक तापमानामुळे जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आलं आहे. अकोला कायम जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये राहिलं आहे. त्यामुळे उष्णतेचा या दशकातील 'नवा हॉटस्पॉट' ही नकोशी ओळख अकोल्याला मिळाली आहे. मागच्या सहा वर्षांतील अकोल्यातील मे महिन्यातलं तापमान कायम 45 अंशांच्या वरच राहीलं आहे. मागच्या सहा वर्षांतल्या तापमानाच्या आकड्यांवरून नजर फिरवली तरी येथील उन्हाची तीव्रता आपल्या लक्षात येईल.
गेल्या सहा वर्षांतील अकोल्याचं कमाल तापमान :
वर्ष तापमान दिनांक 2015 46.4 20 मे 2016 47.1 19 मे 2017 45.7 26 मे 2018 46.9 29 मे 2019 45.8 31 मे 2020 47.4 25 मे
जगातलं, देशातलं, राज्यातलं 'उष्ण शहर' ही ओळख निश्चितच अकोला आणि अकोलाकरांसाठी भुषणावह नाही. त्यामुळे अकोलेकरांनी यावर आता आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. मात्र, तुर्तास अकोल्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि वाढतं ऊन यापासून अकोलेकरांसाठी बचाव करायचा एकच उपाय आहे, तो म्हणजे घरीच थांबण्याचा. त्यामुळे अकोलेकरांनो घरीच थांबा!
Monsoon Prediction | यंदा सामाधानकारक पाऊस पडेल; हवामान खात्याचा अंदाज