'त्या' अहवालामुळे पायाखालची जमीन सरकली, पोटच्या गोळ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर हतबल बापाची फेसबुक पोस्ट
संगणकावर आलेला कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल कर्मचाऱ्याच्या मुलाचाच होता. या घटनेनंतर या बापाने मनाची घालमेल, ओथंबलेल्या भावनांना फेसबुकवर वाट करुन दिली. आपल्या काळजाच्या तुकड्याला कोरोनाची लागण झाल्यावर एका भांबावलेल्या बापाच्या अस्वस्थ भावविश्वाला बोलतं करणारी ही पोस्ट आहे.
अकोला : कोरोनामुळे अख्ख्या जगातील भावना आणि जगण्याचे सर्व संदर्भच पार बदलून गेले आहेत. अकोला जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ही पोस्ट माणूस म्हणून, बाप म्हणून प्रत्येकाला हेलावून-हादरवून सोडणारी आहे.
अकोला जिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणीचे वैद्यकीय अहवाल तपासण्याचं काम एका कर्मचाऱ्याकडे आहे. काल अहवाल तपासताना संगणकावर आलेला अहवाल त्याला प्रचंड हादरवणारा होता. हा अहवाल होता त्याच्याच दहा वर्षीय चिमुकल्याचा. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याच्या मुलासोबत त्याचे दोन मित्र अन् एका मित्राच्या वडिलांनाही कोरोना झाला आहे. या सर्वांवर सध्या अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यावेळी हादरुन गेलेल्या परंतु भावना दाबून ठेवलेलं मन त्याने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे रितं केलं.
काय आहे या हतबल बापाची भावपूर्ण फेसबुक पोस्ट पाहूया...
"चार दिवसांपूर्वी त्याला ताप होता. त्याला दाखवायला बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेलो होतो. त्याच्यासोबत तपासणीसाठी त्याचे दोन लहान मित्र देखील होते. तिथून घरी निघताना मनात विचारांचं काहूर सुरु होतं, की यांची कोरोना चाचणी करावी की का? मन 'हो-नाही' म्हणत असताना माझ्या मुलासह त्याचे दोन मित्र अन् एका मित्राच्या वडिलांचा स्वॅब तपासणीसाठी दिला. माझ्या छकुल्याचा ताप कमी झाल्याने तो मित्रांसोबत खेळूही लागला होता. मी बिनधास्त अन् निर्धास्त झालो. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी नेहमीसारखा जिल्हा रुग्णालयात कामावर गेलो.
गेल्या महिनाभरापासून संगणकावर दररोज एकच काम, 'पॉझिटिव्ह-निगेटिव्ह'चे 'रिपोर्ट' संगणकावरुन प्रिंट करण्याचे. दररोजचं काम असल्याने आता कोरोना आकड्यांचीही ना भीती वाटायला लागली, ना कौतुक. त्या दिवशीही संगणकावरुन एकामागे एक नाव अन् रिपोर्ट जात होते. मात्र, एक नाव समोर आलं अन् माझ्या पायाखालची जमीनच हालली. हे नाव होतं चक्क माझ्या काळजाच्या तुकड्याचं. मी प्रचंड घाबरलेलो होतो. मग मी समोरचे आणखी तीन अहवाल पाहिले. तर त्याच्या दोन मित्रांचे अन् एकाच्या वडिलांचाही अहवाल पॉझिटिव्ह होता. मला खूप रडावंसं वाटत होतं. मात्र, मी काळजावर दगड ठेवत स्वत:ला सांभाळलं.
घरी गेलो तर त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारी माझी मुलगी अन् पत्नी सारखं विचारत होत्या, अहवाल काय आला? मी मन कठोर करत एकदम सांगितलं. आपल्या पिलाला कोरोना झाला. आता त्याला दवाखान्यात भरती व्हावं लागेल. तितक्यात रुग्णालयातून अॅम्ब्युलन्स भोंगा वाजवत घरासमोर आली. घरात मोठी रडारड सुरु झाली. एरव्ही भावाला कधीच एकटं न सोडणारी माझी मोठी मुलगीही त्याच्यासोबत दवाखान्यात राहण्यास जाण्यासाठी हट्ट करत होती. तो इतका लहान आहे, एकटा कसा राहिल? मुलगी आणि पत्नीच्या प्रश्नांनी मी थंडगार पडलो होतो. एवढा वाईट अन् कसोटीचा प्रसंग कधी आयुष्यात येईल याचा विचारही केला नव्हता. इतक्यात मुलीने खंबीर होतं त्याची बॅग भरली. अन् अॅम्ब्युलन्स माझ्या मुलासह तीन जणांना सोबत घेत भरधाव वेगाने दवाखान्याकडे निघून गेली.
जन्मल्यापासून ते आतापर्यंत ज्याचं बोट आम्ही मायबापाने कधी सोडलं नाही, जो कधी आई-बाबाशिवाय झोपला नाही. आई-बाबांना सोडून राहणं ही त्याच्यासाठी खूप मोठी कठीण परीक्षा आहे. तो ही कठीण परीक्षा देत आहे. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. मात्र, आज पहिल्यांदाच तिचा लाडका भाऊ वाढदिवसाला अनुपस्थित आहे. तो रुग्णालयात कोरोनाशी लढतो आहे. बेटा!, तुला या परिस्थितीतून बाहेर पडण्याची शक्ती ईश्वर देवो.. माझ्या संपूर्ण जन्माचं पुण्य, आयुष्य तुला लाभो. तू आणि तुझे सर्व मित्र सुखरुप घरी परत या... बेटा, तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्कीच दिदीला कळवतो.
तुझेच, बाबा.