निवडणूक आली की येता, पाच वर्ष कुठं असता? अजित पवारांचा विरोधकांना सवाल, म्हणाले, सिंगापूरच्या धर्तीवर बारामतीचा विकास करु
तुम्ही उमेदवारांकडे बघू नका तुम्ही माझ्याकडे बघा त्यांच्याकडून काम करून घेण्याची माझी जबाबदारी असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
Ajit Pawar : बाकीच्या तालुक्यातील परिस्थिती आणि आपली बारामतीची परिस्थिती बघा, मी म्हणणार नाही सगळं अलबेल आहे. आमचे विरोधक काही गल्ली बोळ दाखवतात. ही बारामती बघा आणि ती बारामती बघा. ते बदल फक्त अजित पवारच करु शकतो. विरोधक निवडणूक आली की येतात तुम्ही पाच वर्षे कुठं असता? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली.
बारामती नगरपरिषदेत 8 जण बिनविरोध केलेत, आता 33 उमेदवार रिगणात आहेत. 91 पासून तुम्ही मला साथ दिली, कधी सरकारमध्ये होतो कधी नव्हतो. बारामतीत निधी देत असताना दर्जेदार काम कसे होतील हेच मी बघितल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. उद्या लोकं विचार ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील त्यामुळे मी आज सभा घेतली आहे. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे. कधीही आपल्या जातीत धर्मात अंतर पडलेलं आपण बघितले नाही. आपल्या वडीलधार्यांनी आपल्याला शिकवले आहे.
विरोधक निवडणूक आली की येतात पण तुम्ही पाच वर्षे कुठं असता?
मी बारामतीच्या जेवढ्या बारकाईने गोष्टी बघत असतो तेवढा कोणी मायका लाल बघणार नाही हा माझा दावा आहे. विरोधक निवडणुकीच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न करतायेत. विधानसभेच्या वेळी देखील हाच प्रयत्न झाल्याचे अजित पवार म्हणाले. तुम्ही उमेदवारांकडे बघू नका तुम्ही माझ्याकडे बघा त्यांच्याकडून काम करून घेण्याची माझी जबाबदारी असल्याचे अजित पवार म्हणाले.
आपलं बजेट 40 ते 45 कोटी आहे. आज मी सरकार मध्ये आहे. त्यामुळे मी काम करू शकतो. 40 ते 45 कोटीत काहीच करू शकत नाही. माझ्या ओळखीनं केंद्रात आणि राज्यातला निधी आणू शकतो. कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटनासाठी राज्यपालांना बोलावलं आहे. मंत्र्यांना उद्घाटन करता येणार नाही कारण आचारसंहिता आहे. बारामती प्रोजेक्ट पाच एकराचे नर्सिंग कॉलेज काढतो आहे. 55 कोटीचे बजेट आहे. तिथेच 10 एकरात कॅन्सर हॉस्पिटल करतो आहोत. तुम्ही फक्त साथ द्या असे अजित पवार म्हणाले. आज कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. लोकांना सांगतोय बिडी उडू नका तंबाखू नका गुटखा खाऊ नका असे अजित पवार म्हणाले.
घरातील लोक सुद्धा साथ देत नाहीत. तुम्ही साथ देता म्हणून मी झोकून काम करतो
मला 41 च्या 41 नगरसेवक निवडून द्या. मी बारामतीत मध्ये आयआयटी आणि आयआयएम आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तुम्ही जेवढे मला साथ देता तेवढं कोण कोणाला साथ देत नाही. घरातील लोक सुद्धा साथ देत नाहीत. तुम्ही साथ देता म्हणून मी झोकून काम करतो असे अजित पवार म्हणाले. सर्वांगीण विकास माझ्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही दुसऱ्या कोणाचा घास नाही.
सिंगापूरच्या धर्तीवर बारामती स्मार्ट सिटी करण्याचा आमचा मानस
सिंगापूरच्या धर्तीवर बारामती स्मार्ट सिटी करण्याचा आमचा मानस आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये पवार साहेबांनी आणि अनेक लोकांनी लक्ष घातलेला आहे काळाची गरज आहे. जाती धर्माचे भाव करणारा मी नाही तशी माझ्या बाप जाद्यांची शिकवण नाही. तुम्ही या निवडणुकीत माझ्याकडे लक्ष द्या पुढचे पाच वर्ष लक्ष देण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्याच अजित पवार म्हणाले. बारामती नगर परिषदेत नगरसेवक कमी आले तर माझेच जबाबदारी ना? तुम्ही एकमेकांची जिरवायला जाल माझी जिरेल असे अजित पवार म्हणाले.
बाहेरच्यांचा अजिबात नाद करू नका फक्त माझा नाद करा
बाकीचे सांगतील आमच्याकडे सत्ताच नाही, आमची केंद्रात सत्ता नाही, मग कशाला मत मागायला येता? असा सवाल अजित पवार यांनी केला. मुलांना सायन्स कळावं म्हणून आपण 12 कोटीचं सायन्स पार्क उभा करत आहोत. मी जेवढं विकासाचं सांगतोय तेवढं समोरचं कुठलाच पॅनल सांगू शकत नाही असे अजित पवार म्हणाले,. बाहेरची लोक येतील आणि सांगतील तुमचं आणि माझं बरं वाईट बारामतीत होणार आहे, बाहेरच्यांना काही फरक पडत नाही. बाहेरच्यांचा अजिबात नाद करू नका फक्त माझा नाद करा असे अजित पवार म्हणाले.
दिल्लीमध्येही बारामतीचं कुतूहल
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहा तारखेला जेवण ठेवलं होतं तिथे आम्ही गेलो होतो. त्यावेळी मला अनेकजण म्हणाले की दादा मला बारामती बघायला यायचे आहे. अनेक लोकांना कुतूहल आहे. हे कुतूहल दिल्लीमध्ये आहे हे मला पाहायला मिळाल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार राहणार असल्याचेही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, रावसाहेब दानवेंचा दावा























