यशवंत जाधवांनी मातोश्रीला दिलेल्या 50 लाखांच्या घड्याळाचे बिल आणि त्यावरील जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल ; किरीट सोमय्यांचा टोला
शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ( Yashwant Jadhav) मातोश्रीला दिलेल्या 50 लाखांच्या घड्याळाचे बिल आणि त्यावरील जीएसटी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पाहिला असेल, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या (KIrit Somaiya) यांनी लगावला आहे.
KIrit Somaiya : शिवसेनेचे नेते आणि माजी बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav) यांच्या डायरीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. आयकर विभागाच्या धाडीमध्ये यशवंत जाधव यांची डायरी आयकर विभागाला मिळाली आहे. आता डायरीत नोंद केलेल्या मातोश्री नेमक्या कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण जाधव यांच्या डायरीत याच मातोश्रींना दोन कोटी रुपये आणि पन्नास लाख रुपयांचे घड्याळ दिले असल्याची नोंद आहे. यावरूनच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) निशाणा साधला आहे. "मला आशा आहे की, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दिलेल्या 50 लाखांच्या घड्याळाचे बिल आणि त्यावर भरलेला जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल." असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
गेल्या महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरावर आणि त्यांच्या संपत्तीवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. या धाडीनंतर यशवंत जाधव यांच्या डायरीची सर्वात जास्त चर्चा होत आहे. याच डायरीमध्ये यशवंत जाधव यांच्या हिशोबाच्या नोंदी आहेत. त्यामध्येच दोन कोटी रुपये आणि पन्नास लाख रुपयांच्या घड्याळीची नोंद मातोश्रीच्या नावे आहे. परंतु, या डायरीत नोंद करण्यात आलेल्या मातोश्री या आपल्या आई असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला असल्याची आयकर विभागातील सूत्रांची माहिती आहे. आता या मातोश्रीच्या नोंदीवर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. त्यातच किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमुळे त्यांचा रोख आता अजित पवार यांच्याकडे तर नाही ना? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
I hope #AjitPawar has seen the Bill of ₹50 lac Clock given by #YashwantJadhav to #Matoshree & the GST paid on it.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 28, 2022
मला आशा आहे की, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दिलेले ५० लाखांच्या घड्याळाचे बिल आणि त्यावर भरलेला जीएसटी अजित पवारांनी पाहिला असेल @BJP4India
"यशवंत जाधव यांनी मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो असे उत्तर दिले आहे. बरेच जण स्वतःच्या आईला मातोश्री म्हणतात. काही जण आई म्हणतात तर काही मातोश्री म्हणतात. ते स्वतः सांगत असताना तुम्ही त्याला अधिक उकळी देण्याचे काम का करत आहात? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या या प्रश्नावरूनच किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील नेते यशवंत जाधव यांची बाजू घेऊन डायरीतील मातोश्री या यशवंत जाधव यांच्या आईचा असल्याचे ठामपणे म्हणत असले तरी या सर्व प्रकरणाची ईडीने चौकशी करावी आणि डायरीतील मातोश्री म्हणजे नेमकं कोण? याचा तपास करावा अशी मागणी विरोधक करत आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत यशवंत जाधव यांनी मातोश्रीला कोट्यवधी रुपये दिल्याची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या