Exclusive : एमआयएम गुजरातमध्ये निवडणुका लढवणार, खासदार इम्तियाज जलील यांची माहिती
एमआयएम आता भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये राजकीय एन्ट्री करणार आहे. खासदार तसेच एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे.
औरंगाबाद : हैदराबाद व्हाया महाराष्ट्र व बिहारनंतर आता एमआयएम आता भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये राजकीय एन्ट्री करणार आहे. गुजरातमध्ये भारतीय ट्रायबल पार्टी सोबत युती करून नगरपालिका निवडणूका एमआयएम लढवणार असल्याची माहिती खासदार तसेच एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना जलील म्हणाले की, अहमद पटेल यांच्या निधनानंतर गुजरातेत काँग्रेस संपली आहे. त्यामुळे तिथली मुस्लिम मतं आपल्या बाजूने घेण्याचा एमआयएमचा प्रयत्न असणार आहे. गुजरातमध्ये केवळ निवडणुका लढणार असं नाही तर जिंकणार म्हणजे जिंकणारच, असं इम्तियाज जलील म्हणाले.
इम्तियाज जलील म्हणाले की, एमआयएम गुजरातमध्ये आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहे. ही चांगली गोष्ट आहे आतापर्यंत प्रोजेक्ट करण्यात आलं होतं की एमआयएम एक कट्टर पार्टी आहे. आम्हाला अछूत समजायचे. आपण बिहार मध्ये पाहिलं असेल अनेक राजकीय पक्षांबरोबर आमचे अलायन्स झालं होतं. आम्ही निवडणूक लढलो आणि जिंकलो. आम्हाला 5 जागा मिळाल्या. आता गुजरातमध्ये छोटू भाई वसावा यांची भारतीय ट्रायबल पार्टी आहे. त्या पार्टीसोबत आम्ही युती करणार आहोत. त्यांचा खूप प्रभाव आहे. तिथं त्यांचे तीन आमदार आहेत. ओवेसी साहेबांबरोबर बोलणी झाली आहे. तिथं आम्ही दोघे अलायन्स करून गुजरातमध्ये लोकल इलेक्शन लढणार आहोत, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, नगर पालिका निवडणुकांसह स्थानिक निवडणुकांमध्ये आम्ही सोबत लढणार आहोत. यासाठी आम्ही गुजरातला जाणार आहोत. एक जानेवारीला बडोद्याला , तीन जानेवारीला सुरतला जाणार आहे. गुजरात म्हणजे यांची जागीर आहे, इथे कोणी येऊ शकत नाही, जिंकू शकत नाही असा भाजपचा समज आहे. आम्ही तिथे जात आहोत, असं ते म्हणाले.
इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल आता राहिले नाहीत. त्यांच्यामुळे मुस्लिम समाज काँग्रेसला जोडला होता. आता त्यांच्या निधनामुळे मुस्लिम समाजाला वाटते आता काँग्रेसचे काही खरे राहील नाही. दुसरी राजकीय पार्टी तिथे नाही, जी बीजेपीला टक्कर देवू शकतील. आता एमआयएम पक्ष आहे जो भाजपला तोडीस तोड उत्तर देऊ शकेल, असं जलील म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही गुजरातमध्ये निवडणूक लढणार. केवळ लढवणारच नाही तर जिंकणार म्हणजे जिंकणार.