Anand Mahindra Tweet: नगरच्या फोल्डिंग जिन्याचे आनंद महिंद्रा यांना कौतुक, जागेअभावी केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल
Ahmednagar Viral Video : नगरच्या युवकांनी फोल्डिंग जिना तयार केला असून त्यांच्या या कामाचे आनंद महिंद्रा यांनी कौतुक केलं आहे.
अहमदनगर : सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर काहीतरी हटके, जुगाड पाहून ते अनेकदा प्रभावित होतात, अशा गोष्टींचं ते नेहमीच कौतुक देखील करतात. अशाच पध्दतीने अहमदनगर शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान, आसिफ पठाण आणि एजाज खान यांनी बनविलेल्या फोल्डिंग जिन्याचे आनंद महिंद्रा यांनी कौतुक करत या जिन्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Outstanding. So simple yet creative. Apart from de-cluttering space, this actually adds an attractive aesthetic element to an otherwise stark exterior wall. Should make Scandinavian designers envious!! (Don’t know where this is from. Received in my #whatsappwonderbox ) pic.twitter.com/IBC6RR591y
— anand mahindra (@anandmahindra) July 16, 2022
अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर असलेल्या राज एंटरप्राईजेस दुकानाशेजारी अतिशय अरुंद गल्लीत जागेअभावी जिना करणं कठीण जात होतं. त्यावेळी नगरच्या पंचपीर चावडी येथील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान या युवकाला फोल्डिंग जिना बनविण्याची कल्पना सुचली. समीर हा फेसबुकवर नेहमीच अशा जुगाडू निर्मितीचे व्हिडीओ पाहत असतो. त्यातूनच अशा पध्दतीचा जिना आपण येथे बनवू शकतो अशी कल्पना त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितली. खरं तर हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याबाबत त्यांना खात्री नव्हती. सोबतच प्रयोग करताना होणारा खर्च वाया जाऊ शकतो याची कल्पना असून देखील त्यांनी हा प्रगोग करण्याचे ठरवले आणि त्यांनी हा फोल्डिंग जिना बनवला.
एका युझरने महिंद्रा यांच्या ट्वीटला रिप्लाय करत म्हटलं आहे की, तुम्ही जिन्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर बाहेरून कुणी हे बंद केलं तर काय?. इंटरलॉक आणि सुलभ प्रवेश दोन्ही बाजूंनी आवश्यक आहे. त्यावर महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, हो,यावर त्यांना काम करावं लागेल
Yes, they need to solve for that. Right now it would make for a good chase sequence in a film, if the guy making his getaway locked the stairs from below! 😊 https://t.co/yvgCu0UoIa
— anand mahindra (@anandmahindra) July 16, 2022
या जिन्याच्या प्रत्येक पायरीला एक बिजागरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे या पायऱ्या फोल्ड होऊन हा जिना शेजारील भिंतीला लॉक करता येतो. त्यामुळे जेव्हा जिन्याचा वापर करायचा असेल तेव्हाच तो जिना काढता येतो इतरवेळी तो भिंतीला लावता येतो. त्यामुळे या गल्लीतील जागा येण्या-जाण्यासाठी वापरता येते. हा जिना बनविण्यासाठी त्यांना एका पायरीसाठी 1500 रुपये खर्च आला आहे. या जिन्याला 12 पायऱ्या असून इतर साहित्याचा खर्च पकडून 20 हजार रुपये या जिन्यासाठी खर्च आला आहे.
हा जिना बनविल्यानंतर समीर बागवान यांनी त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर पोस्ट केला. जो आनंद महिंद्रा यांच्या पाहण्यात आला. महिंद्रा यांना असा हटके गोष्टी नेहमीच प्रभावित करतात, त्यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवरून पोस्ट करत या कामाचे कौतुक केलं. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत जवळपास चार लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर या व्हिडीओवर पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत.
आनंद महिंद्रा यांनी केलेल्या कौतुकामुळे ऊर्जा मिळाली
थेट आनंद महिंद्रा यांनी आपल्या कामाचे कौतुक केल्याने आपल्याला आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचं दरबार फेब्रिकेशनचे समीर बागवान यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. महिंद्रा यांनी व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर नातेवाईक, मित्रांचे फोन येत असून अनेकांनी आमचा सत्कार करून कौतुक केल्याचे बागवान यांनी म्हटलं आहे.