एक्स्प्लोर
शिवसैनिकांची दुहेरी हत्या, आमदार संग्राम जगतापांना पोलिस कोठडी
अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, याप्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली आहे
अहमदनगर : बिहारलाही लाजवेल असा प्रकार काल अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांना शनिवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर रविवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
आमदार संग्राम जगतापसह चौघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, एसपी कार्यालय तोडफोड प्रकरणी 22 जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
या प्रकरणी काँग्रेसचा संदीप गुंजाळ हा पोलिसांना शरण आला असून त्याच्याकडून पिस्तूल आणि गुप्ती हस्तगत करण्यात आली आहे.
सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचं शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांनी सांगितलं.
नगरमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या
शनिवारी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला. शिवसेनेनं अहमदनगर बंदची हाक दिल्यानंतर रस्त्यांवर कडकडीत बंद पाळल्याचं चित्र पाहायला मिळालं. अहमदनगर शहरात शिवसेनेने निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते. शिवसेना नेते रामदास कदम, दिवाकर रावते, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर अहमदनगरला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला शिर्डी दौरा रद्द केला. एसपी कार्यालयातील तोडफोड प्रकरणी गुन्हे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिजीत कळमकर, आमदार संग्राम जगताप यांचे भाऊ, झेडपी सदस्य सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले यांच्यासह चार नगरसेवक आणि अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर एसपी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय आहे प्रकरण?
अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. दोघांचेही मृतदेह झाकल्यानंतर शिवसैनिकांनी पोलिसांना हातही लावू दिला नव्हता. या हत्याकांडानंतर जमावानं दगडफेक करुन वाहनांची मोडतोड केली. त्यामुळे केडगावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली. पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकरचा चुलत भाऊ विशाल कोतकर हा कॉँग्रेसकडून विजयी झाला. त्यानं शिवसेनेच्या विजय पटारेचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वीपासून शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये राजकीय वाद झाला होता. त्याचबरोबर शाब्दिक चकमकही उडाली होती. त्यामुळे याचंच पर्यवसान हत्यांमध्ये झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीकडून आमदार आहेत, तर त्यांचे वडील अरुण जगताप विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे आमदार आहेत. कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम यांची पत्नी आहे, तर कर्डिलेंची दुसरी कन्या सुवर्णा या माजी उपमहापौर असून माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत. कोतकर यांची कन्या आमदार अरुण जगताप यांची सून आहे. राजकारण अबाधित ठेवण्यासाठी हाडवैर असलेल्या तिघांनी सोयरीक केली, मात्र राजकारणमुळे अशोक लांडे हत्येनंतर पुन्हा हे संकटात सापडले आहेत. लांडे हत्या प्रकरणी कर्डिले यांनीही तुरुंगवास भोगला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement