(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केल्यास मिळणार चोप! अहमदनगरमधील गावाची भन्नाट शक्कल
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतने एक अनोखी शक्कल लढवली आहे. काष्टी ग्रामपंचायतने गावातील चौका-चौकात ऊस वाहतूकदारांना इशारा देणारे फलकच लावले आहेत.
Ahmednagar News: धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करताना अपघात होऊन अनेकांचे बळी गेल्याच्या घटना वाढत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतने एक अनोखी शक्कल लढवली आहे. काष्टी ग्रामपंचायतने गावातील चौका-चौकात ऊस वाहतूकदारांना इशारा देणारे फलकच लावले आहेत. धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली तर चोप देण्याचा इशाराच ग्रामपंचायतने दिला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात चार साखर कारखाने आहेत, तर बाजूच्या दौंड तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत, त्यामुळे तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ऊस वाहतूक होत असते. त्यातच काष्टी हे गाव महामार्गावर असल्याने या रस्त्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते.
चौकाचौकात सूचना आणि इशारा देणारे फलक
उस वाहतूक सुरू असताना ऊस वाहतूकदार मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावतात तसेच ट्रॅक्टर किंवा ट्रकला रिफ्लेक्टर लावत नाहीत. अतिशय वेगानं वाहनं चालवतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. अशा अपघातात दरवर्षी तालुक्यातील 50 जणांचा बळी जात असल्याच काष्टी ग्रामस्थांनी सांगितले आणि म्हणूनच काष्टी ग्रामपंचायत एक ठराव करून चौका - चौकात सूचना आणि इशारा देणारे फलक लावले आहेत. एवढंच नाही तर नियमांचे पालन केले नाही तर चोप देण्याचा इशाराच दिला आहे.
धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्यांना चाप बसेल
याबाबत संबंधित प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आणि म्हणूनच ग्रामस्थांना हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत. कारखान्याने देखील अशा पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचा ऊस हा खाली करून न घेतल्यास धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्यांना चाप बसेल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
नऊ दिवसापूर्वी अशाच एका अपघातात तालुक्यातील गणेश शिंदे, स्वप्निल मनुचार्य, ऋषिकेश मोरे या युवकांचा मृत्यू झाला होता. अशा घटना या वारंवार होत असल्याने आता ग्रामस्थांनी थेट वाहतूकदारांना चोप देण्याचा दमच भरला आहे. आता ग्रामस्थ अशा धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे तपासणी करतात आणि त्यांना इशारा आणि सूचना देत आहेत.
ही बातमी देखील वाचा