40 कोटींची जमीन 5 कोटींना विकली, समता नागरी सहकारी पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप, सहकार आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
राज्यातील अग्रगण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Ahilyanagar News : राज्यातील अग्रगण्य म्हणून गणल्या जाणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याने पतसंस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर समता पतसंथेवर झालेले आरोप राजकीय हेतूने केले जात असल्याची प्रतिक्रिया संचालक संदिप कोयटे यांनी दिली आहे. संस्थेचे संस्थापक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने याला निवडणुकीची किनार असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे.
समता पतसंस्थेवर 40 कोटींची जमीन 5 कोटींना परस्पर विकल्याचा आरोप
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्जदार वसंत घोडके यांनी समता पतसंस्थेवर 40 कोटींची जमीन 5 कोटींना परस्पर विकल्याचा आरोप केला आहे. घोडके यांच्या फिर्यादीवरुन पतसंस्थेच्या संचालकांसह सात जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह कर्जदार संजय मोरे, ओमप्रकाश खके आणि वसंत घोडके यांनी केलेल्या तक्रारीनंतर सहकार आयुक्तांनी समता पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिल्याने पतसंस्थेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
समता पतसंस्थेत राज्यातील 30 शाखेत 1100 कोटींच्या वर ठेवी
समता पतसंस्थेत राज्यातील 30 शाखेत 1100 कोटींच्या वर ठेवी आहेत. मात्र संस्थेवर झालेल्या आरोपांनी ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान पतसंस्थेवर होणारे आरोप चेअरमन संदीप कोयटे यांनी फेटाळून लावले आहेत. सभासदांचा संस्थेवर विश्वास असून केवळ संस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे हे कोपरगाव नगराध्यपदाची निवडणूक लढवत असल्याने संस्थेवर होणारे आरोप हे राजकीय षडयंत्र असल्याचं कोयटे यांनी म्हटलं आहे. तर कुठलीही चौकशी झाली तरी आम्ही सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया संदिप कोयटे यांनी दिली आहे. समता पतसंस्थेच्या संचालकांवर दाखल झालेले गुन्हे आणि सहकार विभागाने लावलेली चौकशी यामुळे कोपरगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.. पतसंस्थेचे संस्थापक काका कायटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने पालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजणार हे मात्र नक्की.
कोपरगावमधील राजकीय वातावरण तापले
समता पतसंस्थेच्या संचालकांवर दाखल झालेले गुन्हे आणि सहकार विभागाने लावलेली चौकशी यामुळे कोपरगावमधील राजकीय वातावरण तापले आहे. पतसंस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कायटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने कोपरगाव पालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजणार यात शंका नाही. तर 20 तारखेला मतदान पार पडणार असून काळे आणि कोल्हे यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.























