Abdul Sattar : सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही, वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश, कृषीमंत्र्यांची माहिती
राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नसल्याचे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केले.
Abdul Sattar on Agriculture Loss : राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सचिवांसह सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे, त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाही. पण ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल असेही सत्तार म्हणाले.
परतीचा पाऊस हा काही पहिल्या वर्षी झाला असे नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही असेही सत्तार म्हणाले. जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे. त्या नुकसानीचा आकडा लकरच कळेल. त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे सत्तार म्हणाले. प्रत्येक वेळी कृषी विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होते. साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारनं आतापर्यंत दिली आहे. पुढच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही नाही याची दक्षता कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी घेतील असे सत्तार म्हणाले. पंचनामा करण्याचे तत्काळ आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत तोपर्यंत अंतिम नुकसानीचा आकडा येणार नाही असे सत्तार म्हणाले.
गेल्या 25 वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झालं
पहिल्या नुकसानीचे तीन हजार 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 600 कोटी रुपये नंतर दिले त्यानंतर गोगलयीनं नुकसान झालेल्या क्षेत्राला देखील मदत दिली असल्याचे सत्तार म्हणाले. गेल्या 25 वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झालं असल्याचे सत्तार म्हणाले. विरोधी पक्षाला फक्त विरोधच करायचा आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आत्महत्येसारखं पाऊस उचलू नका. हा अंतिम पर्याय नसल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: