लोककलावंत कांताबाई सातारकरांपाठोपाठ कन्या अनिता अन् नातवाचं कोरोनानं निधन; खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. सर्वात आधी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर (Kantabai Satarkar) यांच 25 मे रोजी निधन झालं. त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या आणि नातवाचं कोरोनामुळं निधन झालं. अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे. खेडकर कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संगमनेर : काही दिवसांपूर्वी तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर (Kantabai Satarkar) यांच संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी खेडकेर कुटुंबियांना कोरोनाची लागण झालेली होती.
खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. परंतु, अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे. सर्वात आधी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच 25 मे रोजी निधन झालं. त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या आणि नातवाचं कोरोनामुळं निधन झालं. त्यामुळे खेडकर कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ दिवसांत तिघांचं कोरोनामुळे निधन झाल्यानं सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सन 2005 मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे.
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचा थोडक्यात परिचय
गुजरातमधील बडोदा जिल्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव आणि चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी जन्मलेया कांताबाईना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. इथे कांताबाई कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरु झाला. छोट्यामोठ्या तमाशात काम करीत त्या खूप मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून करता करता त्यांच्यातील अस्सल कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थिएटरला जाऊ लागला.
1964 मध्ये अचानक तुकाराम खेडकरांचे निधन झाले. आणि शब्दशः वनवास म्हणता येईल अशी अवस्था कांताबाईंच्या आयुष्यात आली. पण तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच धाडशी होत्या. कधीकाळी पतीच्या म्हणजे स्वतःच्याच तमाशा फडात काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडत काम करणे रुचत नव्हते. त्यांनी जिद्दीने पै-पै जमवून स्वतःचा तमाशा फड उभा केला. एका स्त्रीने परंपरेने वाट्याला आलेला सुतळीचा तोडाही न घेता स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आणि पुढे अमाप लोकप्रियता मिळून आजही तेव्हढ्याच दिमाखात उभा असलेला एकमेव तमाशा फड हा कांताबाईंचाच.
एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित,अभिजित,नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यांच्या जीवनावर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे. असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या या महान कलावतीला मात्र रसिकांचे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Kantabai Satarkar : ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांची कारकीर्द फोटोच्या माध्यमातून