तब्बल 245 दिवसानंतर तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी खुलं होणार; 'हे' निर्बंध पाळावे लागणार
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेलं तुळाजापुरातील तुळजाभवानी मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर सोमवार पासून पाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांना दर्शनासाठी खुले केले जाणार असून तब्बल 245 दिवसानंतर मंदिर खुले होणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. तर व्यापारी दुकाने थाटून सज्ज आहेत. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईटवर दररोज 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार आहेत. दर 2 तासांना 500 भाविकांना दर्शन मिळणार आहे.
तुळजाभवानी भक्तांना देवीचे मुखदर्शन मिळणार असून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नसणार आहे. ऑफलाईन मोफत दर्शन पास मंदिर परिसरात काढता येणार आहेत. तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेल्या कार्यालयात मोफत पास पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात पहाटे 5 पासून रात्री 9 वाजेपर्यंत या 16 तासांच्या काळात भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई, स्वच्छता आणि सॅनिटायझर व्यवस्था केली जात आहे.
65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना, गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिरात प्रवेश करण्यास, तसेच दर्शनासाठी बंदी असणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार, भाविकांना तुळजाभवानी देवीचे मुखदर्शन दिले जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्ससाठी वर्तुळाकार पट्टे ओढली जाणार आहेत. त्यासाठी किमान 6 फूट अंतर राखले जाणार आहे.
पाहा व्हिडीओ : आंदोलनामुळे मंदिरं उघडण्याचा निर्णण घेतला : आचार्य तुषार भोसले
पुजारी, महंत आणि मानकरी हे तुळजाभवानी देवीच्या सर्व धार्मिक विधी आणि पुजा सरकारने दिलेल्या कोविड नियमानुसार करतील. भक्तांना तुळजाभवानी देवीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, सिंहासन पुजेसह आणि इतर पूजा करता येणार नाहीत. मात्र मुख दर्शन घेता येणार आहे. सामुहिक आरती करता येणार नसून तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नाही.
तुळजाभवानी मंदिर अनेक महिन्यानंतर सुरु झाल्याने भाविकांनी एकाच दिवशी एकत्र गर्दी न करण्याचे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना राज्यासह अन्य भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी एक कसरत ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Temples Reopen: पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
- सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- शिर्डी साई दरबारी सोमवारपासून ऑनलाईन दर्शन मिळणार, भाविकांना गर्दी न करण्याचं साई संस्थानचं आवाहन
- तब्बल आठ महिन्यानंतर देव भक्ताला भेटणार; पंढरीत फटाक्यांची आतषबाजी