अद्वय हिरेंची अटक पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग, दादा भुसेंचं षडयंत्र; संजय राऊतांनी थेट फटकारलं
अद्वय हिरे यांना अटक झाली, ती पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे. अद्वय हिरे यांच्यावरील आरोप आधीही होते, तेव्हा ते भाजपमध्ये होते. मात्र, ते शिवसेनेत आले, त्याला घाबरून मंत्रीमहोदयांनी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून षडयंत्र केलं, संजय राऊतांचा घणाघाती आरोप
Sanjay Raut on Advay Hire: शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) उपनेते अद्वय हिरे (Advaya Hire Arrest) यांना काल (बुधवारी) झालेली अटक पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे. हे आरोप त्यांच्यावर आधीही करण्यात आले होते, मात्र, तेव्हा ते भाजपमध्ये (BJP) होते. मात्र आता ते शिवसेनेत (Shiv Sena) आले म्हणून मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी षडयंत्र केलं आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दादा भुसेंवर केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "अद्वय हिरे आणि त्यांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेेते भाऊसाहेब हिरे त्यांचे अद्वय हिरे नातू आहेत, अशी फार मोठी परंपरा हिरे यांना लाभली आहे. पण अद्वय हिरे यांना अटक झाली, ती पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे. अद्वय हिरे यांच्यावर नाशिक जिल्हा बँकेतील कर्जासंदर्भातील काही आरोप आहेत. हे आरोप त्यांच्यावर आधीही होते, तेव्हा ते भाजपमध्ये होते. मात्र, ते शिवसेनेत आले आणि त्यानंतर त्यांनी मालेगावमधे उद्धव ठाकरेंची भलीमोठी सभा आयोजित केली. त्याला घाबरून मंत्रीमहोदयांनी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून षडयंत्र केलं आहे.
अद्वय हिरेंना अटक करून सरकारनं दाखवून दिलंय, आम्ही सुडाचं राजकारण करू : संजय राऊत
"स्वतः दादा भुसेंवर 178 कोटी गिरणा सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. तर राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस सहकारी कारखान्याच्या माध्यमातून 400 कोटींनी फसवलं आहे. अजित पवारांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, असा आरोप खुद्द प्रधानमंत्र्यांनी केला आणि तेच मंत्रीमंडळात मंत्री आहेत. हसन मुश्रीफांनी संताजी घोरपडे कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भाजपचेच लोक करतात. अशा लोकांवर कारवाई होत नाही? मात्र काल अद्वय हिरेंना अटक करून सरकारनं दाखवून दिलं की, आम्ही सुडाचं राजकारण करू.", असं संजय राऊत म्हणाले.
दादा भुसेंनी काहीही केलं तरी, मालेगावचे पुढील आमदार अद्वय हिरेच : संजय राऊत
"अद्वय हिरेंवर दबाव होता की त्यांनी मालेगावात सक्रीय होऊ नये. अद्वय हिरे एकटे नाहीत संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. आमचं पोलिसांना आव्हान आहे, ललित पाटील ड्रग घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे मालेगावपर्यंत आहेत ते शोधून काढा. मालेगावात दादा भुसे पराभवाच्या छायेत आहेत. ते पुन्हा निवडून येणार नाहीत, अशी त्यांना भिती आहे. दादा भुसेंनी काहीही केलं तरी मालेगावचे पुढील आमदार अद्वय हिरेच आहेत." , असं संजय राऊत म्हणाले.