(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Virus : महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचे थैमान, आजाराची लक्षणे काय? काळजी काय घ्यावी?
Lumpy Virus : राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे
Lumpy Virus : राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. राज्य पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातायेत. नेमकी या आजाराची लक्षणे काय आहेत, पशुपालकांनी काय काळजी घ्यायला हवी.
राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर आणि बीड या जिल्ह्यातील जनावरांमध्ये सध्या लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यानंतर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात हा त्वचा रोगाचा पादूर्भाव झाला आहे. संपूर्ण राज्यात 850 जनावरांना लम्पीने ग्रासले आहे, त्यापैकी आतापर्यंत 590 जनावरे बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर संपूर्ण राज्यात आतापर्यंत 10 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या 67 जनावरांना हा आजार झाला असून पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत.
अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात लम्पी आजराची जनावरे आढळून येतात...पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण हाती घेण्यात आलाय...त्यामुळे वेळीच या आजाराला रोखण्यात प्रशासनाला यश येतंय.
लम्पी स्कीन आजाराची प्रमुख लक्षणे काय?
या आजारात जनावरांच्या डोळयातून आणि नाकातून पाणी येते.
लम्पीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनावरांना ताप येतो.
जनावरे चारा खाणे, पाणी पिण्यास कमी होतात.
हळूहळू डोके, मान, मायांग, कास या भागावर गाठी येतात.
डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात, तसेच डोळ्यांची दृष्टी बाधित होते.
पायावर तसेच कानामागे सूज येते.
जनावरे दूध देण्यास कमी पडतात.
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे... लम्पी स्किन आजार हा कीटकांपासून पसरतो... त्यामुळं पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी?
लम्पी हा संसर्गजन्य आजार असल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
जनावरांच्या गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.
निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
गायी आणि म्हशींना एकत्रित ठेवू नये.
लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करावे.
बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता आणि तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
बाधित जनावरांचा मृत्यू झाला तर कमीत कमी 8 ते 9 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.
मृत जनावरांच्या खाली आणि वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.
जनावरांमधून माणसांमध्ये हा आजार पसरत नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी या जनावरांचे दूध वापरात आणू नये असाही सल्ला दिला जातोय. लम्पी आजारात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले तरी दुध उत्पादनावर परिणाम होत असल्याने पशुपालकांनी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.