बीडमध्ये ACB कारवाईचा धडाका, लाचखोरांच्या आवळल्या मुसक्या; आता ST मधील अधिकाऱ्यास रंगेहात अटक
लाच लुचपत विभागाच्यावतीने आणखी एका कर्मचाऱ्याला 30 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली
बीड : सरकारी काम आणि 6 महिने थांब.. अशी म्हण नागरिकांकडून सातत्याने आठवण करुन दिली जाते. दफ्तर दिरंगाई व फाईलवर वजन पडल्याशिवाय सरकारी कामाला वेगच येत नाही. त्यातूनच, सरकारी खात्यात भ्रष्ट्राचार (Corruption) मुळापर्यंत रुजला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील एसीबी कारवाईची धडक मोहिम गेल्या आठवडाभरात चालू असल्याचं दिसून येत आहे. आधी सर्वात आधी पोलीस दल, त्यानंतर पाटबंधारे विभाग आणि आता एसटी महामंडळातील अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. बीडच्या एसीबीकडे (ACB) एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दिनेश राठोड यांच्याविषयी लाच (Bribe) संदर्भाने तक्रार आली होती. गेल्या काही दिवसांत 2 सरकारी बाबुंना लाच घेताना अटक केल्यानंतर आता दिनेश राठोड यांनाही 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी पकडले आहे. त्यामुळे, गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाया चांगल्याच चर्चेत आहेत.
लाच लुचपत विभागाच्यावतीने आणखी एका कर्मचाऱ्याला 30 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली. गेल्या 10 दिवसांतील ही तिसरी कारवाई असल्याने जिल्ह्यातील लाचखोर सरकारी बाबुंमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक ते दीड आठवड्यात जिल्ह्यात अनेक मोठे मासे गळाला लावले आहेत. विशेष करुन पोलीस दलातील अधिकारी लाचेत अडकल्यानंतर वरिष्ठ ऑफिसरही लाच घेताना पकडले. त्यामुळे, एसीबीच्या कारवाया जिल्ह्यात चर्चेत आहेत.
जिल्ह्यातील एसटी महामंडळातील कर्मचारी असलेल्या तक्रारदाराने बीडच्या एसीबीकडे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या दिनेश राठोडबाबत तक्रार दिली होती. तक्रारदाराला अंबाजोगाई, परळी येथे नियुक्ती हवी होती. मात्र, त्याठिकाणी त्याला नियुक्ती न देता गावला पाठविण्यात आले होते. दरम्यान, तक्रारदार नियुक्ती देण्यात आलेल्या माजलगावला रुजू झाला नव्हता. 1 महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर त्याच्यावर कारवाईचा ठपका ठेवण्यात आला. मात्र, या कारवाईत सहकार्य करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीडमधील कामगार अधिकरी दिनेश राठोडने कर्मचाऱ्याकडे 30 हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराने लागलीच लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून ही लाच स्वीकारताना एसीबीने लाचखोर अधिकारी दिनेश राठोडला रंगेहात अटक केली आहे.
पोलीस अधिकाऱ्याला अटक
दरम्यान, बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या प्रकरणात आरोपी न करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच पोलीस अधिकाऱ्याने मागितली होती. याप्रकरणी 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसमाला एसीबीने अटक केली होती. हरिभाऊ खाडे पोलिसावर ही कारवाई करण्यात आली, त्यानंतर तो शरण आला होता. जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेतील 100 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीत नाव समाविष्ट करण्याची भीती दाखवून दोन व्यावसायिकांकडून लाच उकळण्याचा प्रयत्न खाडेने केला होता.