Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 26 फेब्रुवारी 2022 : शनिवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
1. नाटोकडून युक्रेनला थेट लष्करी सहकार्य मिळण्याची शक्यता धुसर, युक्रेन-रशिया शिष्टमंडळाच्या चर्चेकडे लक्ष, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारत-चीनची पुन्हा तटस्थ भूमिका
Russia-Ukraine War : युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेले युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारत आणि चीननं पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे चिंतेत असल्याचे भारताने म्हटलं आहे. युद्ध कोणत्याही समस्येवर तोडगा नाही, त्यामुळे हिंसाचार थांबावा तसंच शत्रुत्व तात्काळ दूर व्हावं यासाठी प्रयत्न केले जावेत असंही भारताने नमूद केलं आहे. या प्रस्तावावर 15 पैकी 11 देशांनी मतदान केलं नाही. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी भारताकडे मदत मागितली होती. मात्र भारताने तटस्थ भूमिका घेतल्याने अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाटोकडूनंही युक्रेनला थेट लष्करी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन सध्या एकटं पडल्याचं पाहायला मिळत आहे.
चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत
युद्ध थांबवून चर्चेनं मार्ग काढला जावा अशी मागणी जगभरातून होत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन सरकारनं शुक्रवारी चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत दिले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी वेळ आणि स्थळ निश्चित करण्याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे किव्हमधील अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केलं आहे. दशकातील सर्वात वाईट युरोपीय सुरक्षा संकटात रशियन सैन्याला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आणि राजधानीचे रक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे.
2. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र 4 विमानं पाठवणार, पुतिन यांच्याकडून सुरक्षेची हमी, आज मोदींच्या उपस्थितीत पुन्हा उच्चस्तरीय बैठक
3.रशिया-युक्रेनमध्ये चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत; दुसरीकडे रशियन सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या सीमेवर
4. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंचं आजपासून मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषण, तर मुख्यमंत्र्यांकडून मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र मागासवर्ग आयोगाची घोषणा
5. आता धाडी घाला, पण लक्षात ठेवा प्रत्येकाचा दिवस असतो, केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवर उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर 'मी पुन्हा येईन'वरुन फडणवीसांनाही टोला
6.. दोन मार्चपासून मुंबईतल्या शाळा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, पालकमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा, इतर शहरांतल्या शाळांबाबतचा निर्णय प्रतीक्षेत
7.मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी 24 तासांनंतरही सुरुच, सीआरपीएफ आणि पोलिसांचा बंदोबस्त
8.राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत, 973 नव्या रुग्णांची नोंद तर मुंबईत 128 नवे कोरोना रुग्ण
9. धरमशालात भारत-श्रीलंका दरम्यान दुसरा टी-२० सामना, विजयी आघाडी घेण्याचे रोहित सेनेचं लक्ष्य, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर
10. मराठी राजभाषादिनानिमित्ताने एबीपी माझावर दोन दिवस मराठीचा वैचारिक जागर, आज आणि उद्या साहित्य, कला, राजकारणासह विविध क्षेत्रातील दिग्गजांचं मंथन