Shaurya Award 2023 : सन्मान शौर्याचा आणि धैर्याचा, असामान्य काम करणाऱ्या वीरांचा एबीपी माझाच्या वतीनं सन्मान
Shaurya Award : सर्वसामान्य असूनही ज्यांनी असामान्य धैर्य दाखवत स्वतःच्या जीवाची बाजी लावली त्या शूरवीरांचा एबीपी माझ्याच्या वतीनं सन्मान करण्यात आला. त्यांना शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
ABP Majha Shaurya Award 2023 : आपल्या अवतीभवती अनेक घटना, दुर्घटना घडत असतात. त्यावेळी मदतीसाठी धैर्याने, हिंमतीनं धावून जातो तो खरा वीर असतो. त्यांच्या शौर्याला सलाम केलाच पाहिजे. त्यांच्या हिंमतीला दाद देत लढ म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे. सर्वसामान्य असूनही ज्यांनी असामान्य धैर्य दाखवत स्वतःच्या जीवनाची बाजी लावली त्या शूरवीरांचा सन्मान सोहळा एबीपी माझाच्या (ABP Majha) वतीनं करण्यात आला. त्यांना शौर्य पुरस्कार (Shaurya Award 2023) देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. पाहुयात पुरस्कार प्राप्त वीरांची सविस्तर माहिती...
Latabai Koli : लताबाई कोळी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील कोळंबा या गावातील लताबाई दिलीप कोळी यांच्या शौर्यांची अनोखी कहाणी आहे. लताबाई कोळी यांचे वय 55 वर्षे आहे. समोर बिबट्या आला म्हणून या वाघिणीनं थेट पूर आलेल्या तापी नदीत उडी टाकली आणि बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली खरी पण महापुराचं संकटही तितकंच बिकट होतं. प्रवाहाला प्रचंड वेग होता. त्या प्रवाहासोबत खेचल्या जाऊ लागल्या. नशिबानं केळीचं एक खोड हाती लागलं. त्याच्या आधारानं एकटीचा तो भर पुरातला प्रवास सुरु झाला. रात्रीच्या मिट्ट काळोखात तापीच्या त्या महाभयंकर पुरात तब्बल तेरा तास त्या पोहत होत्या. या तेरा तासात त्यांनी जवळपास साठ किलोमिटर अंतर पार केलं होतं. रात्रीच्या त्या अंधारात महापुराच्या त्या धडकी भरवणाऱ्या प्रवाहात मृत्यू कोणत्या रुपात येईल याची कसलीही शाश्वती नसताना लताबाईंनी जे धाडस दाखवलं ते आपल्या साऱ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच धाडसाला एबीपी माझाचा सलाम.
Pravin Rathod: प्रवीण राठोड
घटना परभणीतल्या जिंतुर तालुक्यातील गडद गव्हाणवाडीतली आहे. इथल्या अंगणवाडीत विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवला जात असताना गॅसच्या पाईपला गळती लागली आणि आगीचा भडका उडाला. त्यावेळी 25 चिमुकले त्या शाळेत होते. त्यांचा जीव धोक्यात होता. एकीकडं पेटलेला सिलिंडर, समोर 25 चिमुरडे जीव आणि बाहेर फक्त बघ्यांची गर्दी होती. त्याचवेळी तिथं पोहोचले प्रवीण राठोड. कोणत्याही क्षणी सिलिंडरचा स्फोट होऊन सगळं होत्याचं नव्हतं होण्यासारखी परिस्थिती असताना प्रवीण आपल्या जिवाची पर्वा न करता आत घुसले. घाबरल्या मुलांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढलंच पण त्याचबरोबर बॉम्ब बनलेल्या सिलिंडरचा नॉबही बंद केला. संकट टळलं. त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता चिमुकल्या जिवांसाठी देवदूत बनून धावलेल्या प्रवीण राठोडांना एबीपी माझाचा सलाम!
Namrata Katare : नम्रता कटारेच्या धाडसाला सलाम
कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी इथं अवघ्या पाच वर्षांचा शौर्य अंगणात खेळत होता. घरची मंडळी शेतीच्या कामात व्यस्त होती आणि नेमकं तेव्हाच अघटीत घडलं. शौर्य खेळता खेळता विहिरीत पडला आणि बुडू लागला. ही गोष्ट बाजुलाच असलेल्या नम्रताच्या लक्षात आली. आपला भाऊ बुडतो आहे हे पाहाताच तिने आरडाओरडा केला आणि कसलाही विचार न करता काठोकाठ भरलेल्या त्या विहिरीत उडी घेतली. बुडणाऱ्या शौर्यचा जीव तिने वाचवला. अवघ्या 15 वर्षांच्या नम्रतानं दाखवलेलं प्रसंगावधान आणि धाडस अतुलनिय आहे. शौर्यचा प्राण वाचवणाऱ्या याच नम्रताला एबीपी माझा शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे.
Sanjana Pavde : संजना पावडे
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दरोडी येथील संजना पावडे यांनी सुद्धा मोठं धाडसाचं काम केलं आहे. संजना पावडे यांनी आपल्या नवऱ्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवणारी वाघीण आहे. तो प्रसंग कोणाच्याही अंगावर शहारा येईल असाच होता. जनावरांच्या गोठ्यातून कसला आवाज येतोय पाहाण्यासाठी गोरख पावडे बाहेर आले, तर त्यांच्या समोर साक्षात मृत्यू बनून ऊभा ठाकला बिबट्या. त्या हिंस्त्र श्वापदाने गोरख यांची थेट मानच पकडली. त्याचवेळी संजना पावडे बाहेर आल्या. आपल्या पतीची ती अवस्था बघून कोणीही खचलं असतं पण संजना यांच्या अंगात थेट वाघिणच संचारली. त्यांनी बिबट्याच्या पायाला आणि शेपटीला पकडून खेचायला आणि मारायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचा कुत्राही मदतीला धावून आला. शेवटी बिबट्याचा नाईलाज झाला आणि तो पळून गेला. गोरख पावडे यांचा जीव वाचला. आपल्या पतीसाठी थेट बिबट्याशी झुंजणाऱ्या संजना पावडे यांना एबीपी माझाचा मानाचा मुजरा.
Kishore Sanjay Gadhe : किशोर संजय गाढे, पोलिस दलाची प्रतिमा उंचावणारे
11 सप्टेंबरला औंरंगाबादमधल्या देवगिरी नदीला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यात तीन महिला अडकल्या होत्या. हळूहळू पाण्याचा जोर वाढू लागला. पाण्यात अडकलेल्या महिलांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला होता. परिस्थिती गांभीर्य लक्षात येतात तिथे हजर असलेल्या पोलिस हवालदार संजय गाढे यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच तीनपैकी दोन महिलांचा जीव वाचवण्यात यश आलं. या मदतकार्या दरम्यान संजय गाढे बेशुद्धही झाले होते. इतकंच नाही तर सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 39 दिवस उपचार सुरु होते. जीवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिस हवादाराच्या शौर्याला एबीपी माझाचा सलाम
Deepak Gharat: पोलीस कर्मचारी दिपक घरत यांनी आगीतून वाचवले सहा महिन्यांच्या चिमुकल्याला
कल्याण पश्चिम परिसरात आरटीओ जवळील सर्वोदय हाईट्स इमारतीतील एका घराला 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. कुटुंबियांच्या बचावासाठी घरातील खिडकीतून आरडाओरड सुरू केला घराच्या बाल्कनीत येण्याचं प्रयत्न करत होते. मात्र याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या मुंबई पोलिस दलातील जवान दिपक घरत यांनी क्षणाचाही विलंब न लावता इमारतीला बांधलेला परांचीवरुन वरती चढत घरातील सदस्यांना सुखरुप बाहेर काढले. दिपक यांनी यापूर्वी फोर्स वन कमांडो म्हणून काम केले असल्याने त्यांना या घटनेचा सामना कसा करायची याची माहिती असल्याने त्यांनी हे मदतकार्य करत सहा जणांचे जीव वाचविले. यामध्ये सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. या कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांना आज एबीपी माझाच्या वतीनं शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
Mayur Patil : मयूर पाटील या पोलिस कर्मचाऱ्याने वाचवले तरुणीचे प्राण
वडाळा बरकत अली नाका इथं प्रेमप्रकरणातून तरुणाचा तरुणीवर चाकूहल्ला झाला होता. सपासप वार करत असताना पोलीस कर्मचारी मयूर पाटील तिथे पोहोचला. त्याने एक वार स्वतःच्या हातावर झेलत तरुणीचा प्राण वाचवला. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली होती. मयूर पाटील यांना एबीपी माझाच्या वतीनं शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
Satish Kamble : सतीश कांबळे
कोल्हापूरमधील दिवंगत सतीश कांबळे यांच्या धाडसाला सलाम करावा लागेल. कारण त्यांना स्कुलबस चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. साक्षात मृत्युनं गाठलं असतानाही पहिल्यांदा बस नियंत्रित करुन ती थांबवली. बसमधल्या चिमुकल्यांना सुरक्षित केलं आणि मग प्राण सोडला. सतीश कांबळे यांनी दाखवलेलं हे प्रसंगावधान आणि धाडस शब्दांच्या पलीकडचं आहे. त्यासाठीच त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.