Pune Bypoll election : 'आम आदमी पक्ष'ही कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात; लवकरच उमेदवार घोषित करणार
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे
Pune Bypoll election : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. आम आदमी पक्ष (आप) कसबा (Kasba Bypoll Election) , चिंचवड (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणूक लढवणार आहे. आम आदमी पक्षाने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 9 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आपचे प्रभारी गोपाळ इटालिया आज पुण्यात आहेत. त्यांच्याकडून पुण्यातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा केली जात असल्याची माहिती आहे.
आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यात कसबा आणि चिंचवड मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली आहे. भाजपने आपले उमेदवार घोषित केले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीदेखील लवकरच उमेदवार घोषित करणार आहे. त्यातच आता आम आदमी पार्टीदेखील निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. आपच्या प्रभारी यांच्याकडून पुण्यातील नेते, पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे आणि आप आज संध्याकाळी करणार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाने देखील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे भाजप ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत असतानाच आपकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्यास, हा भाजपसाठी एक धक्का असेल.भाजपकडून निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीयांच्या प्रमुख नेत्यांशी फोनवरुन चर्चा केली आहे आणि निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपाच्या आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी फार कमी अवधी बाकी आहे. सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी पोटनिवडणूक लढू नये. आमच्या जागा आमच्यासाठी सोडाव्या, असंही ते म्हणाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी.अशी इच्छा व्यक्त करत सर्वपक्षीय नेत्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनीदेखील आतापर्यंतची परंपरा पाहता लोकप्रतिनिधींचं निधन झालं की, त्या मतदार संघात निवडणूक बिनविरोध होते. त्यामुळे या दोन्ही मतदार संघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमदेपणा भाजपनं दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवावा, असंही त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिलं आहे.