9 April In History: महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा जन्मदिन, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला सुरुवात; आज इतिहासात
9 April In History: सामाजिक, राजकीय घटनांच्यादृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा जन्मदिन आहे. तर, आजच्या दिवशी 1965 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान कच्छच्या रणचे युद्ध सुरू झाले होते.
9 April In History: 9 एप्रिल रोजी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सामाजिक, राजकीय घटनांच्यादृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा जन्मदिन आहे. तर, आजच्या दिवशी 1965 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान कच्छच्या रणचे युद्ध सुरू झाले होते.
1828 : गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म
महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असणारे गणेश वासुदेव जोशी यांचा आज जन्म. त्यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाते. जातिभेदाच्या अनिष्ट प्रथेला सार्वजनिक काकांचा विरोध होता.
गणपतरावांनी २ एप्रिल १८७० रोजी 'पुणे सार्वजनिक सभे'ची स्थापना केली. या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' हे टोपणनाव मिळाले होते. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा' ही जनतेची गाऱ्हाणी सरकारदरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती.
1893 : महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा जन्मदिन
हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक, पंडित व तत्त्वज्ञानी, महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा जन्मदिन.
लहानपणापासून विरक्त वृत्तीचे असल्याने साधू बनण्यासाठी ते काशी येथे गेले. तेथे त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. या काळात ते आर्य समाजाकडे वळले. निःस्वार्थी वृत्तीच्या हिंदू मिशनऱ्यांची संघटना उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1917 मध्ये रशियात झालेल्या साम्यवादी क्रांतीने ते प्रभावित झाले होते. पाली, संस्कृत, अर्धमागधी या प्राचीन भाषांसह इंग्रजी, अरबी, फारशी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, चिनी, जपानी, तिबेटी, रशियन इ. भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
‘साम्यवाद ही क्यों’, ‘मानवसमाज’, ‘राजनीती’ हे ग्रंथ लिहिले. व्होल्गा ते गंगा, दर्शन दिग्दर्शन, भागो नही दुनिया बदलो, दिवोदास आदी पुस्तके प्रचंड गाजली आहेत. या पुस्तकांचे मराठीतह अनुवाद झाले आहेत. राहुल सांकृत्यायन यांच्या पुस्तकांचे जगातील सर्व भाषांत अनुवाद झाले आहेत. धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुराण, प्राच्यविद्या, व्याकरण, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक आदी विषयांवर त्यांनी 150 हून ग्रंथ लिहिले.
साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धम्मपट, विजयपिटक या बौद्ध ग्रंथांचा हिंदी अनुवाद, तुरुंगात असताना ‘व्होल्गा से गंगा’ हा कथासंग्रह, याशिवाय ‘मेरी साधक यात्रा’, ‘तिब्बत मे सवा वर्ष’, 'मेरी लडाख यात्रा', ‘मेरी युरोप यात्रा’ ही प्रवासवर्णने, ‘सतमी के बच्चे’, ‘बहुरंगी धपुरी’ या कथा तर ‘जीने के लिए’, ‘जय योधेय’ या कादंबऱ्या ही त्यांची साहित्यसंपदा आहे. वैदिक हिंदू धर्म, आर्यसमाज, साम्यवाद, बौद्ध धर्म आणि शेवटी मानवता हाच धर्म असा सांकृत्यायन यांचा व्यापक वैचारिक प्रवास आहे.
1948 : अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्मदिन
बॉलिवूडमध्ये सहजसुंदर अभिनयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री जया भादुरी-बच्चन यांचा आज जन्मदिवस आहे. जया भादुरी यांनी 1963 मध्ये सत्यजीत रे यांच्या महानगर या चित्रपटातून आपल्या सिने कारकिर्दीस सुरुवात केली होती. ऋषिकेश मुखर्जी 'गुड्डी' या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. उपहार, कोरा कागज, जंजीर, चुपके चुपके, मिली, अभिमान आदी चित्रपटही गाजले. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे कमी केले होते. विशेषत: मुलांच्या जन्मानंतर त्यांनी काम करणे थांबवले. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिलसिला या चित्रपटानंतर त्यांनी सिनेजगतापासून दूर राहणे पसंद केले. मात्र, निर्माती म्हणून देख भाई देख सारख्या काही मालिकांची निर्मिती केली. पुढे 1998 मध्ये गोविंद निहलानी यांच्या 'हजार चौरासी की माँ' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत.
1965 : कच्छच्या रणात भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध
1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धात भारताचा पराभव, त्यानंतर 1964 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर भारत खचला असल्याचे अनेकांचे मत झाले होते. त्यानंतर देशाची सूत्रे सांभाळणारे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे दुबळे नेतृत्व असल्याचा कयास बांधून पाकिस्तानने काश्मीर आणि सीमावादाच्या मुद्यावर भारतावर युद्ध लादले. पाकिस्तानने भारताविरूद्ध १९६५ मध्ये दोन युद्धे (एक कच्छचे रणात व दुसरे काश्मीर पंजाब या भागात) लादली. कच्छ रणातील काही भागांवर पाकिस्तानने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. कच्छ रणातील युद्ध हे पाकिस्तानने काश्मीर, पंजाबच्या बाजूने हल्ला करण्यासाठी केलेली चाचपणी असल्याचे म्हटले जाते.
2001: साहित्यिक शंकरराव खरात यांचे निधन
शंकरराव खरात हे लेखक, कादंबरीकार व इतिहासकार होते. आंबेडकरी चळवळीतील ते एक प्रमुख लेखक होते. दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. शंकरराव खरातांची 'माणुसकीची हाक' ही कादंबरी प्रचंड गाजली.
2009 : निर्माते शक्ती सामंत यांचे निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम निर्माते-दिग्दर्शक अशी शक्ती सामंत यांची ओळख होती. त्यांनी जवळपास 43 चित्रपट दिग्दर्शित केले होते. कटी पतंग, अमर प्रेम आणि आराधना सारख्या सुपरहिट चित्रपटात त्यांचा वाटा होता. अतिरंजित भावुक कथानक, श्रवणमधुर संगीत व लोकप्रिय कलावंतांचा प्रभावी हृदयस्पर्शी अभिनय ही शक्ति सामंत यांच्या गाजलेल्या यशस्वी चित्रपटांची जमेची बाजू होती. सामंतांनी एकूण 43 चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांतील 37 हिंदी व सहा बंगाली चित्रपट होते.
2011: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले
केंद्र सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल कायदा लागू करावा अशी मागणी करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, किरण बेदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत मोठे आंदोलन सुरू झाले होते. अण्णा हजारे यांच्या उपोषणामुळे सरकारवर दबाबही निर्माण झाला होता. अखेर अनेक चर्चेनंतर लोकपाल कायदा लागू करण्याची मागणी मान्य केल्यानंतर अण्णा हजारे यांनी 95 तासांचे आमरण उपोषण संपवले.