7 April In History: जागतिक आरोग्य दिन, भारताचे एडिसन डॉ. शंकर भिसे यांचा स्मृतीदिन, अभिनेते जितेंद्र यांचा वाढदिवस; आज इतिहासात
7 April In History: भारताचे एडिसन अशी ओळख असलेले डॉ. शंकर भिसे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांनी केलेले अनेक संशोधने महत्त्वाची ठरली. त्याशिवाय, कवी राजा बढे यांचा स्मृतीदिन आहे. अभिनेते जितेंद्र, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आज वाढदिवस आहे
7 April In History: भारताच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारताचे एडिसन अशी ओळख असलेले डॉ. शंकर भिसे यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांनी केलेले अनेक संशोधने महत्त्वाची ठरली. त्याशिवाय, कवी राजा बढे यांचा स्मृतीदिन आहे. अभिनेते जितेंद्र, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा आज वाढदिवस आहे. जाणून घेऊयात इतिहासातील महत्त्वाच्या घटनांबाबत...
जागतिक आरोग्य दिन World Health Day
7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली. ज्यामध्ये "जागतिक आरोग्य दिन" साजरा मागणी करण्यात आली होती. पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर दरवर्षी त्या तारखेला साजरा केला जातो. यंदा जागतिक आरोग्य दिनाचे 75 वे वर्ष आहे. जागतिक आरोग्य दिन 2023 ची थीम "सर्वांसाठी आरोग्य" अशी आहे.
1891: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचा जन्म
जगातील हुकूमशाहीवर आपल्या व्यंगचित्राने ताशेरे ओढणारे सर डेव्हिड लो यांचा आज जन्मदिवस. मूळचे न्यूझीलंडचे असलेले सर डेव्हिड यांनी कारकिर्द बहरली ती इंग्लंडमध्ये. न्यूझीलंडमधून सिडनीमध्ये ते 1911 मध्ये स्थलांतरीत झाले. त्यानंतर पुढे 1919 मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी काढलेली व्यंगचित्रे गाजली. मुसोलिनी आणि हिटलरच्या फॅसिस्ट विचारांवर त्यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून परखड भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या व्यंगचित्रांना इटली आणि जर्मनीत बंदी घालण्यात आली.
1919 : कवी कश्मीरी लाल जाकिर यांचा जन्मदिन
काश्मिरी लाल जाकीर हे उर्दू साहित्यातील भारतीय कवी, कादंबरीकार, नाटककार आणि लघुकथा लेखक होते. 1940 मध्ये लाहोरच्या 'दुनिया' या प्रकाशनात प्रकाशित झालेल्या त्यांच्या पहिल्या गझल अदाबीपासून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांनी अनेक कादंबऱ्या, नाटके, लघुकथा आणि प्रवासवर्णने लिहीली आहेत. जाकीर यांनी तत्कालीन ब्रिटीश भारतात पंजाब शिक्षण विभागात काम केले आणि हरियाणा उर्दू अकादमीचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. हिंदी आणि उर्दूमध्ये लेखन केले आहे. तीन सिहार एकल, एक गझल काव्यसंग्रह, अब मेरे पुत्र दो, एक कादंबरी आणि ए माओ बेवना बेटियो, लेखांचा संग्रह त्यांनी लिहीला आहे. भारतीय साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल, भारत सरकारने त्यांना 2006 मध्ये पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे.
1920 : भारतरत्न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म
भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त भारतीय संगीत आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे संगीतकार आणि प्रसिद्ध सितार वादक रवी शंकर यांचा जन्मदिन. भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
1935 : भारताचे 'एडिसन' शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे निधन
डॉ. शंकर आबाजी भिसे हे एक मराठी शास्त्रज्ञ व संशोधक होते. त्यांना भारताचे एडिसन असे म्हटले जाते. 1897 मध्ये ' इन्व्हेन्टर रिव्ह्यू ॲन्ड सायंटिफिक रेकॉर्ड' नामक मासिकाने 'स्वयंमापन यंत्र' करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंमापन यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाइकाला हवे तेवढे वजन करून देणारे यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती. पुढे त्यांनी शंकर आबाजी भिसे यांनी 200 हून अधिक निरनिराळे शोध लावले आणि त्यातील 40 हून अधिक संशोधनांची पेटंट घेतली. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांची होती.
1942 : हिंदी चित्रपट अभिनेते जितेंद्र यांचा जन्म
सन 1942 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, चित्रपट निर्माते जितेंद्र कपूर यांचा जन्मदिन. जितेंद्र यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला. मुंबईत ते लहानाचे मोठे झाले. हिंमतवाला, धरम वीर, फर्ज, हातिम ताई, तोहफा, नागिन, जुदाई यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केले आहे. सहजसुंदर अभिनय, नृत्य यामुळे चित्रपट रसिकांच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले आहे.
1962 : निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा जन्मदिवस
भारतीय चित्रपटसृष्टीत विशेषत: बॉलिवूडमध्ये विविध धाटणीचे, विषयांवर चित्रपट दिग्दर्शित करणारे राम गोपाल वर्मा यांचा आज जन्मदिन. तेलगू चित्रपटसृष्टीतून त्यांनी आपल्या सिने कारकिर्दीस सुरुवात केली. शिवा, रंगीला, सत्या, कंपनी, शूल, सरकार, भूत, अब तक छप्पन, दौड यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन-निर्मिती राम गोपाल वर्मा यांनी केली. राम गोपाल वर्मा यांनी अनेक नवोदितांना संधी दिली. त्यातील अनेकजणांनी बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
1977: लेखक आणि गीतकार राजा बढे यांचे निधन
जय जय महाराष्ट्र् माझा, चांदणे शिंपीत जाशी अशा गाजलेल्या गीतांचे गीतकार राजा बढे यांचा आज स्मृतीदिन. राजा बडे यांनी काही वर्ष पत्रकार म्हणून काम केले. राजाभाऊ बढे हे चित्रपटात काम करायचे या विचाराने ते १९४० साली पार्श्वनाथ आळतेकर यांच्या आधाराने मुंबईत आले. त्यांचे शिष्यत्व पत्करून बढे यांनी आळतेकरांच्या 'सिरको फिल्म्स'मध्ये दोन वर्षे उमेदवारी केली. त्याआधी नागपूरमध्ये कवी म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली होती. 1956 ते 1962 या काळात ते मुंबई आकाशवाणीवर सुगम संगीत विभागाचे प्रोड्यूसर होते.