कुत्र्याने चावा घेतल्याने मालकाला सहा हजारांचा दंड
कुत्रा चावल्याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला सहा हजार रुपयांचा दंड सांगली जिल्हा न्यायालयानं ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
सांगली : कुत्रा चावल्याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला सहा हजार रुपयांचा दंड सांगली जिल्हा न्यायालयानं ठोठावला आहे. सांगलीच्या वारणाली येथे 2005 मध्ये सायकलवरुन जाणाऱ्या बँक कर्मचारी भीमाशंकर तारापुरे यांच्या पायाचा एका कुत्र्यानं चावा घेतला होता.
तारापुरे यांच्यासह आणि चौघांना या कुत्र्याने चावा घेतला होता. या घटनेनंतर जखमींनी कुत्र्याचे मालक विठ्ठल साखरे आणि गोविंद साखरे यांना याबाबत जाब विचारला. त्यावेळी साखरे बंधुंनी जखमीची समजूत आणि विचारपूस करण्याऐवजी त्यांनाच उद्धटपणे बोलण्यास सुरूवात केली.
साखरे बंधुंचा उद्दामपणा पाहून संतापलेल्या आणि कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भिमाशंकर तारापुरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात साखरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याचा निकाल आता सांगली न्यायालयानं दिला आहे.
सांगली जिल्हा न्यायालयाने कुत्र्याचे मालक विठ्ठल महादेव साखरे व गोविंद महादेव साखरे यांना दोषी ठरवले असून त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत सहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.