(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron : राज्यात आतापर्यंत 28 जणांची ओमायक्रॉनवर मात, आज सहा रुग्णाची नोंद
Omicron Cases In Maharashtra : जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन रुग्णाची संख्या महाराष्ट्रात दररोज वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात सहा नव्या ओमायक्रॉनच्या रुग्णाची भर पडली आहे.
Omicron Cases In Maharashtra : जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉनव्हेरियंटच्या रुग्णाची संख्या महाराष्ट्रात दररोज वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात सहा नव्या ओमायक्रॉनच्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या 54 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत राज्यात 28 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. तर इतर रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. आज आढळलेल्या रुग्णापैकी चार रुग्ण मुंबई विमानतळावर घेतलेल्या चाचणीत आढळले आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रुग्णाचा समावेश आहे. मुंबई आढळलेल्या चारही रुग्णाचे लसीकऱण झालं आहे.
मुंबईत चार रुग्ण -
मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी दोन जण कर्नाटकचे तर, एक औरंगाबाद आणि दुसरा दमनचा रहिवाशी आहेत. त्यांनी यूके आणि टांझानियातून प्रवास केल्याची पार्श्वभूमी आहे. या चारही रुग्णांमध्ये कोणताही लक्षणं नाहीत. यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील एका पाच वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉन विषाणूचे निदान झाले आहे. या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 46 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आहेत. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णाचे लसीकरण झालं आहे.
धोका वाढतोय -
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं आरोग्य विभाग आणि सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. तसेच जगभरातही ओमायक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह (South Africa) ब्रिटेन (Britain) आणि युरोपमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
राज्यात आज 902 कोरोना रुग्णांची नोंद -
रविवारी राज्यात 902 नव्या कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली आहे. तर 9 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच कालावधीत राज्यात 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 854 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, यामध्ये आज किंचीत वाढ झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 97 हजार 500 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71% इतके झाले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या सहा रुग्णांचीही भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 54 इतकी झाली आहे. आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या सहा कोटी 76 लाख 84 हजार 674 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 49 हजार 596 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे एकूण नमुण्यापैकी राज्यात 9.82 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 72,982 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 898 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.