गडचिरोलीत 4 जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण, 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश
हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षली नेत्यांसह अनेक जहाल नक्षल्यानी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पितांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे ही संख्या वाढत आहे.
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांपुढे चार जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून शासनाने या चौघांवर एकूण 22 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पित नक्षल्यांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षली नेत्यांसह अनेक जहाल नक्षल्यानी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पितांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे ही संख्या वाढत आहे.
- दिनेश उर्फ दयाराम गंगर नैताम ( 28 वर्षे) : डिसेंबर 2006 मध्ये टिपागड दलमच्या सदस्य पदावर भरती होऊन फेब्रुवारी 2007 पासून टिपागड सदस्य म्हणून कार्यरत होता. त्यांनतर दलममध्ये अनेक पदं सांभाळत आक्टोबर 2020 पर्यंत भामरागड एरिया कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे 11 गुन्हे , खुनाचे 6 गुन्हे, जाळपोळीचे 3 गुन्हे दाखल असून शासनाने त्याचेवर एकूण 8 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
- नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी (35 वर्षे) : सप्टेंबर २००२ मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती झाला. त्यानंतर विविध पदावर होता. त्याच्यावर चकमकीचे 09 गुन्हे, 4 खूनाचे, जाळपोळीचे 5 गुन्हे, ०9 भूसुरूंग स्फोटाचे गुन्हे दाखल असून, त्याच्यावर शासनाने 8 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
- निला रूषी कुमरे (34 वर्षे) : ही नक्षल महिला नोव्हेंबर 2005 ला कसनसूर दलम मध्ये सदस्य रुपात भरती झाली. नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी प्लाटुन क्र.03 सेक्शन क.01 चा कमांडर याचेसोबल लग्न करून ते दोघेही कसनसूर दलममध्ये कार्यरत होते. निलावर चकमकीचे 3 गुन्हे, 3 खूनाचे, जाळपोळीचे 4 गुन्हे दाखल असून, तिच्यावर शासनाने 2 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
-
शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला (26 वर्षे) : जानेवारी 2011 मध्ये चातगाव दलम मध्ये विविध पदावर आजवर कार्यरत होता. त्याचेवर चकमकीचे 6 गुन्हे, 2 खुनाचे गुन्हे दाखल असून, त्याच्यावर शासनाने 4 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे गेल्या 2 वर्षात आजपर्यंत एकूण 37 माओवादयांनी आत्मसमर्पण केले असून यात 4 डिव्हीसी, 2 दलम कमांडर, 2 दलम उपकमांडर, 28 सदस्य, 1 जनमिलीशिया यांचा समावेश आहे. विकास कामांना आडकाठी करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.