(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4th June in History: चीनमध्ये तियानमेन स्क्वेअर नरसंहार, विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म आणि अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म; आज इतिहासात
4th June in History: सामाजिक आणि दैनंदिन जीवनात 4 जून या दिवसाचं फार महत्त्व आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. आजच्या दिवशी चीनमध्ये तियानमेन स्क्वेअरमध्ये नरसंहार घडला, अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म झाला.
4th June in History: जून महिना सुरू झाला आहे. दरम्यान, या महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 जून चे दिनविशेष.
1904 : भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंग यांचा जन्म
भगत पूरण सिंग यांचा जन्म 4 जून 1904 मध्ये पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील राजेवाल (रोहनो) येथे झाला. हिंदू कुटुंबात जन्माला आल्याने त्यांना लहानपणी रामजी दास हे नाव देण्यात आले. पुढे लहानपणीच त्यांनी शीख बनण्याचा निर्णय घेतला. ते लेखक, प्रकाशक, एक पर्यावरणवादी होते.
1936: चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म
अभिनेत्री नूतन बहल यांची आज जन्मदिवस. त्यांचा जन्म एका मराठी कुटुंबात 4 जून 1936 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील कुमारसेन निर्माते आणि दिग्दर्शक होते, तर आई शोभना अभिनेत्री होत्या. नूतन यांनी वयाच्या 9व्या वर्षी बालकलाकार म्हणून कुमार समर्थ यांच्या 'नलदमयंती' चित्रपटात काम केले होते. 1950 मध्ये त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षीच 'हमारी बेटी' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 11 ऑक्टोबर 1959 रोजी लेफ्टनंट कमांडर रजनीश बहलशी त्यांनी विवाह केला. 1955 मधे 'सीमा' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. त्यांना एकूण 6 वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना वर्ष 1974 मधे पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांचे कर्करोगाने 21 फेब्रुवारी 1991 रोजी मुंबईत निधन झाले.
1946: दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री आणि पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म
एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म मद्रास इलाख्यातील (तत्कालीन, सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्हा) कोनेटमपेट या गावी झाला. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासून लाभला. शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास सुरू केला आणि संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गंगाई अमरन, इलयाराजा, अनिरुद्ध , भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. ही गाणी समाजात लोकप्रिय ठरली आहेत.
1947: विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा जन्म
आपल्या चेहऱ्यावरील विनोदी हावभावाच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ विनोदी चित्रपट अभिनेते म्हणून अशोक सराफ यांनी राज्य केले. अशोक सराफ हे फक्त विनोदी अभिनेतेच नाहीत, तर गंभीर भूमिका सुद्धा ते तितक्याच चोखपणे बजावतात आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खट्याळ प्रियकर असो किंवा अगदी वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईत झाला. त्यांचे कुटुंब मूळचे बेळगावचे. परंतु, दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात ते लहानाचे मोठे झाले.
1947: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन
आचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी हे एक बौद्ध धर्माचे आणि पाली भाषेचे अभ्यासक आणि मराठी लेखक होते. त्यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
1989: चीनची राजधानी बीजिंगमधील तियानमन स्क्वेअर येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लष्करी कारवाई
चीनमधील तियानमेन स्क्वेअरवर निशस्त्र तरुण आंदोलकांवर चिनी लष्कराने कारवाई केली. 4 जून 1989 रोजी चीनची राजधानी बीजिंग येथे चिनी सैन्याने नि:शस्त्र नागरिकांवर शांततापूर्ण निदर्शनं करत असताना बंदुका आणि रणगाड्यांचा वापर केला आणि यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले. ही घटना इतिहासात 'तियानमेन स्क्वेअर नरसंहार' म्हणून ओळखली जाते.
इतर महत्त्वाच्या घटना:
1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
1738: इंग्लंडचा राजा जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)
1876 : ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
1910 : होव्हर्क्राफ्ट चे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1999)
1928 : चीनचे राष्ट्राध्यक्ष हाँग जोलिन यांची जपानी एजंटने हत्या केली.
1940 : दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन सैन्याने फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये प्रवेश केला.
1944 : दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
1962 : अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.
1964: मालदीवने संविधान तयार केले.
1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
1974 : भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
1975 : अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.
1979 : घानामधे लष्करी उठाव.
1990 : भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक यांचा जन्म.
1993 : आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
1994 : वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा 8 डावांत 7 शतकांचा नवा विक्रम.
1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
1995: माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)
1997 : इन्सॅट-2डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
1998 : इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.
2001 : नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.