(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यात या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 लोकांनी गमावला आपला जीव, 10 वर्षातील सर्वोच्च संख्या
राज्यात यावर्षी आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात 30 जणांनी जीव गमावला आहे, गेल्या 10 वर्षातील ही सर्वोच्च संख्या आहे.
औरंगाबाद : राज्यात या वर्षी बिबट्यांचा लोकवस्तीतळावर वावर वाढला आहे.या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 30 लोकांनी आपला जीव गमावला, तर 159 बिबट्यांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्यातील शेतकऱ्यांची बिबट्याच्या भितीनं झोप उडाली आहे.
का वाढत आहेत बिबट्यांचे हल्ले?
बिबट्या नुसतं नाव ऐकलं तरी अंगाचा थरकाप उडतोय. औरंगाबाद, बीड, सोलापूर, अहमदनगर यासह अन्य जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या वावराने लोक दहशतीखाली आहेत. बीडमध्ये चिमुकल्याला डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं. औरंगाबादेत बापलेकांचा शेतात बिबट्याने फडशा पाडला. बिबट्यांना या वर्षात थोड्या-थोडक्या नाही तर 30 लोकांचा बळी घेतला.
बिबट्याचा वावर नागरी वस्तीत वाढला आहे. धक्क्दायक म्हणजे गेल्या 5 वर्षांची आकडेवारी पाहता यावर्षी आतापर्यंत 159 बिबट्यांनी सुद्धा आपला जीव गमावला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार 80 बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. 64 बिबट्यांचा रस्ता ओलांडतांना रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना मृत्यू झाला आहे,तर 2 बिबट्यांची शिकार सुद्धा झाला आहे. तर राज्यात यावर्षी आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात 30 जणांनी जीव गमावला आहे, गेल्या 10 वर्षातील ही सर्वोच्च संख्या आहे..
राज्यात बिबट्यांची संख्या सुद्दा वाढली आहे, खास करून उस लागवड होत असलेल्या भागात खाद्याची आणि लपण्याची सोय असल्यानं या भागात बिबटे अधिक दिसत आहेत. त्यांच्या अधिवासात झालेले अतिक्रमणं, सुरु असलेली रसत्यांची काम या सगळ्यांचा बिबट्यांच्या अधिवासावर परिणाम झाला असल्याचं सुद्दा अभ्यासक सांगतात.
बिबट्या असलेल्या जागी कशी घ्याल काळजी?
- शेतात जातांना एकटं दुकटं जावू नये समूहाने जावे.
- हातात काठी ठेवावी, जोरानं आवाज करत जावे.
- काठीला घुंगरू बांधावेत, मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणी लावावी.
- बसून खुरपणीची कामं करताना, काळजी घ्यावी.
- गळ्याला मोठं जाड कापड बांधावे, बिबट्या खास करून गळ्यावर हल्ला करतो.
- रात्रीच्या वेळी शेतात, बिबट्याच्या क्षेत्रात जाणे टाळावे
बिबट्याची ही भिती दिवसोंदिवस वाढत चालली आहे. त्यातून वर्षभरात 30 लोकांनी बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला ही बाब सुद्धा गंभीर आहे, त्यामुळं या सगळ्यांचाच विचार करण्याची गरज आता आहे. बिबट्याचा अधिवास असलेली क्षेत्र जपण्यासोबत लोकांनी सुद्दा सावध आणि जागरूक राहण्याची गरज आहे. वनविभागानं सुद्धा या नरभक्षक बिबट्यांना शोधून ठार करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित बातम्या :