एक्स्प्लोर
नयना पुजारी बलात्कार, हत्या प्रकरण : तीनही दोषींना फाशीची शिक्षा

पुणे : संपूर्ण राज्याला हादरवून सोडलेल्या संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही दोषींना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी फाशीची शिक्षा सुनावली. त्यांना अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, हत्या, मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा गुन्ह्यांखाली दोषी ठरवण्यात आले. तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्ता केली आहे. योगेश अशोक राऊत (वय 32, रा. मु.पो. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 31, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदूराव कदम (वय 34, रा. हनुमंत सुपर माकर्रेटजवळ, दिघीगांव, मूळ, भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा) अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोषींची नावं आहेत. तर राजेश पांडुरंग चौधरी (वय 31, रा. मु.पो. गोळेगाव, ता. खेड), अशी मुक्तता केलेल्या माफीच्या साक्षीदाराचे नाव आहे. संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय 28) या खाराडी येथील सेनीक्रॉन प्रयव्हेट लिमीटेड या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामास होत्या. त्या 7 आक्टोबर 2009 रोजी रात्री 8 च्या सुमारास कात्रज येथे घरी जाण्यासाठी खराडी येथील रिलायन्स मार्टजवळील लक्ष्मी हॉस्पिटलजवळील बस स्टॉपवर बसची बाट पहात थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी इंडिका कारमधून (एम.एच. 14, बी.ए. 2952) त्या ठिकाणी आले. त्यांनी नयना पुजारी यांना हडपसर येथे सोडण्यासाठी प्रवासी म्हणून कारमध्ये घेतले. त्यानंतर नयना यांना वाघोली, तुळापूर, जरेवाडी (ता. खेड) येथे नेवून सामुहीक बलात्कार करत हत्या केली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान राजेश चौधरी हा आरोपी माफीचा साक्षीदार झाला. दरम्यान या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर काम पहात आहेत. तर बचाव पक्षातर्फे अॅड. बी.ए.आलुर, अॅड. रणजित ढोमसे-पाटील आणि अॅड. अंकुश जाधव काम पाहिले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. निबाळकर यांनी एकूण 37 साक्षीदार तपासले आहेत. तर बचाव पक्षातर्फे अॅड. आलुर यांनी 13 साक्षीदार तपासले आहेत. दोन्ही पक्षाकडून न्यायालयात अंतिम युक्तीवाद झाल्यानंतर आणि न्यायालयास असलेल्या शंकांचेही दोन्ही पक्षांनी निरसन केले. त्यानंतर मंगळवारी न्यायालयाने तीन आरोपींना शिक्षा सुनावली. कोर्टात काय झालं? माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सुटका करण्यात आली होती. शिक्षेची सुनावणी सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र पोलिसांनी तासभर आधीच आरोपींना कोर्टात हजर केलं होतं. न्यायाधीशांनी योगेश राऊतला समोर बोलावून 'शिक्षेबद्दल काही बोलायचं आहे का?' असं विचारलं. 'मला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. मी गुन्हा केलेला नाही. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा.' असं योगेश म्हणाला. 'माफीचा साक्षीदार झालेला राजेश चौधरीही गुन्ह्यात सहभागी होता. आम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर त्यालाही द्या.' अशी मागणीही योगेश राऊतने केली. महेश ठाकूरलाही न्यायाधीशांनी पुढे बोलावून शिक्षेबाबत विचारलं, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. विश्वास कदमला विचारलं असता हा गुन्हा माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. सरतेशेवटी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेचा दाखला दिला. काय आहे प्रकरण? सिनिक्रॉन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या नयना पुजारीचं लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 7 ऑक्टोबर 2009 रोजी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर नयनावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयात ही सुनावणी झाली. योगेश राऊत या मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर या खटल्याला सुरुवात झाली. गेल्या सात वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. अटकेनंतर एकदा योगेश राऊत रुग्णालयातून पळून गेला होता. दीड वर्षं दिल्लीत वेशांतर करुन राहणाऱ्या योगेशला शिर्डीमध्ये पोलिसांनी अटक केली होती. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नयनाचे पती अभिजीत पुजारींसह तिच्या कुटुंबीयांनी केली होती. पोलिसांच्या ढिसाळपणावर ताशेरे ओढत न्यायाधीशांनी आरोपींना न्यायालयात आणण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. संबंधित बातम्या : नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी योगेश कसा अडकला? नयना पुजारी हत्याकांड: बलात्कार, खून, अपहरणाचे आरोप सिद्ध
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर























