25th August Headlines: कोल्हापुरात शरद पवारांची जाहीर सभा, अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; आज दिवसभरात
25th August Headlines: कोल्हापुरात शरद पवारांची आज जाहीर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत.
25th August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. आज उद्धव ठाकरे लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अखेरच्या दिवशी विविध लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.
कोल्हापुरात शरद पवारांची जाहीर सभा
शरद पवार आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरच्या दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून स्वतः शाहू महाराज या सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. शरद पवार कोल्हापूरमध्ये येतील त्यावेळी तावडे हॉटेलपासून पंचशील हॉटेलपर्यंत रॅली निघणार आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे मराठवाड्याची आढावा बैठक घेणार
संभाजीनगरमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे आज मराठवाड्याची आढावा बैठक घेणार आहेत. सध्याची पावसाची स्थिती, भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, पिकांची परिस्थिती यासह इतर प्रश्नांचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
ठाणे पालिकेतील मृत्यूंप्रकरणी अहवाल येणार
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यूवर चौकशी समिती बसवण्यात आली होती. या चौकशी समितीचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे. या अहवालावरून स्पष्ट होईल की, या मृत्यूमागे हॉस्पिटल प्रशासनाची चूक होती की त्यांचे मृत्यू हे नैसर्गिकरित्या झाले होते.
उद्धव ठाकरे विदर्भातील मतदारसंघांचा घेणार आढावा
आज उद्धव ठाकरे लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अखेरच्या दिवशी नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तसच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा ठाकरे यांच्याकडून आढावा घेतला जाईल.
आजच्या सुनावण्या
दापोली साई रिसोर्ट प्रकरणी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर आज निकालाची तारीख आहे. 10 जुलै रोजी राखून ठेवलेला निकाल मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट आज जाहीर करण्याची शक्यता आहे
विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांचे कथित सीए महेश गुरव यांच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज अपेक्षित आहे. मुश्रीफ कुटुंबीयांवर ईडीनं सुरू केलेल्या तपासांत महेश गुरवची भूमिका महत्वाची आहे.