22 April In History : रशियन क्रांतीचा जनक लेनिनचा जन्म, सुभाषचंद्र बोस यांचा ICS सेवेचा राजीनामा; आज इतिहासात
On This Day In History : रशियन राज्यक्रांतीचा जनक लेनीनचा आज जन्म झाला होता, तसेच आजच्याच दिवशी हवामान बदलासंबंधित जगप्रसिद्ध पॅरिस करारावर सह्या करण्यात आल्या होत्या.
22 April In History : पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी आणि वनस्पती वाचविण्याच्या आणि जगभरातील पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने 22 एप्रिल रोजी 'अर्थ डे' म्हणजेच 'वसुंधरा दिन' साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. 1970 मध्ये सुरू झालेली ही परंपरा 192 देशांनी स्वीकारली आणि आज जवळजवळ प्रत्येक वर्षी वसुंधरा दिना साजरा केला जातो. त्याचसोबत आजच्याच दिवशी पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,
1870: रशियन क्रांतीचे जनक लेनिन यांचा जन्म
रशियन कम्युनिस्ट क्रांतिकारक, राजकारणी आणि राजकीय सिद्धांतकार व्लादिमीर लेनिनचा (Vladimir Lenin) जन्म 22 एप्रिल 1870 रोजी झाला. बोल्शेविकांच्या संघर्षाचा नेता म्हणून लेनिनला रशियामध्ये प्रसिद्धी मिळाली. 1917 ते 1924 या काळात तो सोव्हिएत रशियाचा प्रमुख होता. त्याच्या प्रशासनाखाली, रशिया आणि नंतर व्यापक सोव्हिएत युनियन, रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली एक-पक्षीय कम्युनिस्ट राज्य बनले. लेनिन विचारधारेने मार्क्सवादी होता आणि त्याने लेनिनवाद म्हणून ओळखला जाणारा राजकीय सिद्धांत विकसित केला.
1917 च्या फेब्रुवारी क्रांतीनंतर तो रशियाला परतला. त्यावेळी झारचा पाडाव झाला आणि रशियामध्ये तात्पुरते सरकार स्थापन झाले. ऑक्टोबर क्रांतीमध्ये लेनिनने मोठी भूमिका बजावली. त्यामध्ये बोल्शेविकांनी नवीन शासन उलथून टाकले. ते कट्टर कम्युनिस्ट होते आणि लेनिन त्यांचा नेता होता.
1915 : पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्याने प्रथमच विषारी वायूचा वापर केला.
1921: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आयसीएसचा राजीनामा दिला
महान भारतीय क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांच्या आयुष्यात आजचा दिवस महत्त्वाचा होता. कारण आजच्याच दिवशी त्यांनी ब्रिटिशांच्या मानाच्या आयसीएस नोकरीचा राजीनामा दिला आणि पुढचं जीवन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घालवलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या माध्यमातून ब्रिटिशांविरोधात लढा दिला. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी जपान आणि जर्मनीच्या मदतीने ब्रिटिशांविरोधात लढा पुकारला. त्यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेनेचे कार्य हे अतुलनीय असेच आहे.
1958: अॅडमिरल आर.डी. कटारी हे भारतीय नौदलाचे पहिले भारतीय प्रमुख बनले.
1970: वसुंधरा दिवस साजरा करण्यास सुरुवात
जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच अर्थ डे (Earth Day) दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक करणे. यापूर्वी 21 मार्च आणि 22 एप्रिल असे दोनदा पृथ्वी दिन साजरा केला जात होता, परंतु 1970 पासून हा दिवस 22 एप्रिललाच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2016: पॅरिस करारावर 170 हून अधिक देशांच्या स्वाक्षरी
पॅरिस करार (Paris Agreement) किंवा पॅरिस हवामान करार, हा हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय करार आहे. ते 2015 मध्ये मसुदा स्वरूपात तयार करण्यात आले होते. या कराराचा मुख्य मुद्दा होता हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे. 12 डिसेंबर 2015 रोजी पॅरिस येथे झालेल्या 21 व्या परिषदेत 196 पक्षांनी एकमताने ते स्वीकारले. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने म्हणजे 22 एप्रिल 2016 रोजी 170 हून अधिक देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आणि 4 नोव्हेंबर 2016 पासून हा करार लागू करण्यात आला.