20th May In History: वास्को द गामाचा भारतात प्रवेश, कोलबंसचे निधन, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म; आज इतिहासात
20th May In History: इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचं निधनही आजच्या दिवशी झाले. लेखक, पत्रकार 'केसरी'चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला.
20th May In History: आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी समुद्री मार्गाने युरोपला भारताच्याजवळ आणणारा खलाशी वास्को द गामा याने कालिकत बंदरात प्रवेश केला. त्याशिवाय, इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचं निधनही आजच्या दिवशी झाले. लेखक, पत्रकार 'केसरी'चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला.
1498 - पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात दाखल
पोर्तुगिजचा खलाशी वास्को दा गामा याचे भारतात पाऊल पडले. प्रसिद्ध खलाशी वास्को दा गामा यांनी केरळमधील कालिकत या ठिकाणी पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर युरोपमधून भारतात येण्याच्या समुद्री मार्गाचा शोध लागला. पोर्तुगालमधून निघून आफ्रिका खंडात वास्को द गामा याचा ताफा पोहचला होता. त्यापुढे भारत हजारो मैल दूर होता आणि तिथवर पोचायचा मार्ग शोधणं अंधारात सुई शोधण्यासारखं होतं. एका माहितीनुसार, वास्को द गामाला केनियाच्या किनाऱ्यावरील मालिंदी शहरात वास्को द गामाची गाठ एका गुजराती मुसलमान व्यापाऱ्याशी पडली. या व्यापाऱ्याला हिंदी महासागरातील प्रदेशाची चांगली माहिती होती. त्याने सांगितलेल्या मार्गावरून वास्को द गामाने 20 मे 1498 रोजी भारतातील कालिकत गाठले. या प्रवासात त्याला कित्येक डझन सहकारी गमवावे लागले होते.
1506 : इटालियन दर्यावर्दी व संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचे निधन
इटली देशाचा नागरीक असलेले प्रदेशशोधक, दर्यावर्दी व वसाहतकार ख्रिस्तोफर कोलंबस यांचा आज स्मृतीदिन.
स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली कोलबंस याने चार वेळेस अटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे युरोपला अमेरिकी खंडांची ओळख होऊ शकली. युरोपीय साम्राज्यवाद व आर्थिक प्रतिस्पर्धा वाढत होत्या व युरोपीय राज्ये संपत्तीच्या शोधात नवनवीन व्यापारी मार्ग स्थापन करत होते. ह्या पार्श्वभूमीवर पूर्व दिशेला असलेला हिंदुस्थान देश हा पश्चिमी सागरमार्गाने गाठता येईल. ह्या तर्कावर आधारलेल्या कोलंबसच्या मोहिमेला शेवटी स्पेनचा शाही पाठिंबा मिळाला.
स्पेनच्या राजेशाहीला त्या मोहिमेत आशिया खंडातल्या अतिफायदेशीर मसाल्याच्या व्यापाराद्वारे आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी दिसली. आपल्या 1492 च्या पहिल्या सफरीत त्याच्या अंदाजाने कोलंबस जपानला पोचणार होता त्याऐवजी बहामा द्वीपसमूहावर पोहोचला. ज्या ठिकाणी त्यांचे जहाज लागले त्या जागेला कोलंबसने सॅल्व्हॅडोर हे नाव दिले. पुढच्या तीन मोहिमांत कोलंबस वेस्ट इंडीज ,व्हेनेझुएलाचा कॅरिबियन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहीर केले.
तुर्कानी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकल्याने युरोपीयांचे आशिया खंडाशी व्यापार करण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे व्यापार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. यासाठी कोलंबस सागरी मार्गाने निघाला खरा पण तो भारतात न पोहचता उत्तर अमेरिकेत पोहचला. पण आपण भारतातच पोहोचलो आहे अशी त्याची समजूत झाली. मात्र काही वर्षांनी अमेरिगो व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गावर निघाला व अमेरिका खंडात पोहचला. पण त्याला लक्षात आले की हा भारत नसून दुसरीच भूमी आहे, कारण भारतातील लोक शेती करतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याच्या नावावरून या खंडाला अमेरिका असे नाव दिले गेले.
1850: 'केसरी'चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म
मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा आज जन्मदिवस. विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. 1871 साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णूशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता.
1874 साली चिपळूणकरांनी निबंधमाला ह्या मासिकाचे प्रकाशन सुरू केले. 1874 सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी 1878 मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या आणि सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. 1875 मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी किताबखाना नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून 1880 साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1881 सालच्या जानेवारीत त्यांनी 'केसरी' हे मराठी व 'मराठा' हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली.
1902- क्युबाला अमेरिकेपासून स्वातंत्र्य
क्युबा वसाहतीवर अमेरिकेची सत्ता होती. आजच्याच दिवशी क्युबा अमेरिकेच्या जोखडातून मुक्त झाला. पण त्याच्या काही दशकांनी अमेरिकेने क्युबात हस्तक्षेप करून आपल्या मर्जीतील सरकार तयार केले होते. पुढे फिडेल कॅस्ट्रो, राऊल कॅस्ट्रो, चे गव्हेराच्या नेतृत्वात साम्यवादी क्रांती झाली. त्यामध्ये अमेरिकेला पूरक असणारे सरकार उलथवले गेले. त्यानंतर आजही अमेरिका आणि क्युबात सुप्त संघर्ष सुरू आहे.
1929- स्वातंत्र्यसैनिक राजकुमार शुक्ल यांचं निधन
स्वातंत्र्यसैनिक राजकुमार शुक्ल यांचं आजच्या दिवशीच निधन झालं होतं. गांधीजींनी चंपारण्य या ठिकाणी यावं आणि तिथली परिस्थिती समजाऊन घ्यावी यासाठी राजकुमार शुक्ल यांनी गांधीजींना पत्र लिहिलं होतं. त्यांच्याच विनंतीवरुन गांधीजी चंपारण्य या ठिकाणी आले. नंतर गांधीजींनी चंपारण्यचा सत्याग्रह सुरू केला आणि पुढे इतिहास घडला.
1932- भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचं निधन
लाल-बाल-पाल या त्रयीमधील बिपिन चंद्र पाल यांचे आजच्या दिवशी निधन झालं. लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल या तीन नेत्यांनी भारतीय जहालमतवादाचे नेतृत्व केलं आणि युवकांना प्रेरित केलं. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये 1905 ते 1920 हा कालखंड जहालमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो.
1965 - अवतार सिंग चिमा या भारतीय गिर्यारोहकाकडून माऊंट एवरेस्ट सर
आजच्या दिवशी अवतार सिंह चिमा याने माऊंट एवरेस्ट सर केले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय होता. कॅप्टन कोहली यांच्या नेतृत्वाखाली 9 जणांची टीम जगातल्या सर्वात मोठ्या शिखराला सर करण्यासाठी निघाली होती. त्यावेळी अवतार सिंह चिमा याने ही कामगिरी केली.