20th August Headlines: नामवंत उद्योजकांना 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार', दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त पुण्यात रॅली; आज दिवसभरात
20th August Headlines: राज्यातील नामवंत उद्योजकांना आज 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तर पुण्यात दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त रॅली काढण्यात येणार आहे.
20th August Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्यातील नामवंत उद्योजकांना आज 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तर पुण्यात दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त रॅली काढण्यात येणार आहे. राजीव गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रम होणार आहेत.
नामवंत उद्योजकांना देण्यात येणार 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार'
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा समारंभ वांद्रे-कुर्ला संकुलमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये दुपारी दोन वाजता होणार आहे. उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना, तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांना शनिवारी देण्यात आला आहे.
दाभोळकर स्मृतिदिनानिमित्त पुण्यात काढण्यात येणार रॅली
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. दाभोळकरांची जिथे हत्या झाली, त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन आज सकाळी 11 वाजता निर्धार रॅली काढली जाणार आहे. अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणाऱ्या दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक सुरू असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
बावनकुळे चंद्रपुरातून करणार लोकसभा संपर्क अभियानाला सुरुवात
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या लोकसभा संपर्क अभियानाची सुरुवात आज चंद्रपूरपासून करणार आहेत. सकाळी 11 वाजता चंद्रपूरला आल्यावर चंद्रपूर शहरातल्या तुकुम भागात 'संपर्क से समर्थन अभियाना'अंतर्गत सामान्य लोकांशी संवाद साधतील. तर त्यानंतर प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटींतर्गत जेष्ठ आंबेडकरवादी विचारवंत बी. डी. मेश्राम आणि धनोजे कुणबी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते पुरुषोत्तम सातपुते यांच्या घरी भेट देणार आहेत. दुपारी बुरडकर सभागृह येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बावनकुळे बैठक घेणार आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील वणी साठी प्रस्थान करतील.
चंद्रयान-3च्या लँडर मॉड्यूलचं आज दुसऱ्यांदा 'डीबूस्टिंग'
चंद्रयान-3 चं लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेलं लँडर मॉड्यूल आज दुसऱ्यांदा'डीबूस्टिंग' करणार आहे, ज्यामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ जाईल. भारतीय वेळेनुसार शनिवारच्या मध्यरात्री 2 वाजता दुसऱ्यांदा डीबूस्टिंग होणार होतं. विक्रम लँडरच्या डीबूस्टिंगचा पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झालय. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' 23 ऑगस्टला होणं अपेक्षित आहे.
पुणे - शरद पवार यांच्या हस्ते संजय नहार यांच्या सरहद संस्थेने कात्रज भागात उभारलेल्या कॉलेजचे उद्घाटन सकाळी 11 वाजता होणार आहे.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा यासाठी कार्यशळा भरवण्यात येणार आहे, संध्याकाळी चार वाजता होणाऱ्या या कार्यशाळेला शरद पवार आणि रोहित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
राजीव गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रम
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या 79व्या जयंतीनिमित्त आज दिल्लीतील वीरभूमीवरील आयोजित कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सकाळी साडेसात वाजता सहभागी होतील. आज राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहे. या वर्षी बनस्थली विद्यापीठाला राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि सौहार्द या क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होतील. जवाहर भवन सभागृहात संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होईल. तर राहुल गांधी वडिलांच्या, म्हणजे राजीव गांधींच्या जयंतीनिमित्ताने लडाखच्या पँगॉन्ग लेकवर असतील, सकाळी 7 वाजता ते तिथे प्रार्थना करतील.