17th August In History: स्वराज्याच्या इतिहासातील थरारक घटना; आग्र्याहून औरंगजेबाच्या नजरकैदेतून शिवाजी महाराज निसटले; आज इतिहासात
17th August In History: स्वराज्याच्या इतिहासातील एक थरारक घटना आजच्या दिवशी झाली. शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याच्या हातावर तुरी देत नजरकैदेतून निसटले.
17th August In History: स्वराज्याच्या इतिहासातील एक थरारक घटना आजच्या दिवशी झाली. शिवाजी महाराज यांनी मुघल सैन्याच्या हातावर तुरी देत नजरकैदेतून निसटले. तर, क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा हुतात्मा दिनही आज आहे.
1666 : औरंगजेबाच्या हाती तुरी, शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले
मराठेशाहीच्या इतिहासातील एका थरारक पर्व, रोमहर्षक घटनेने इतिहासात नोंद केली. 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्र्याच्या नजरकैदेत बंदिवान असलेले शिवाजी महाराज आणि लहानगे संभाजी राजे यांनी औरंगजेबाच्या सैन्याच्या हातावर तुरी देत आग्र्यातील नजरकैदेतून सुटका केली. मुघल सरदार मिर्झा जयसिंग राजे हे औरंगजेबाच्या आदेशानंतर स्वराज्यावर चालून आले. मिर्झा राजेंच्या आक्रमणानंतर रयतेसाठी, स्वराज्याची हानी अधिक होऊ नये यासाठी शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला. त्यानंतर या तहानुसार, शिवाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबची भेट घ्यावी असे ठरले. त्यानुसार, महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात हजेरी लावली. मात्र, मुघल दरबारात झालेल्या अवहेलनेमुळे संतापलेल्या महाराजांनी स्वाभिमान दाखवत दरबारातून बाहेर पडले. तर, दुसरीकडे या घटनेनंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यात नजरकैदेत ठेवले.
औरंगजेबाकडून घातपात होईल, असा महाराजांचा होरा होता. त्याआधीच आग्राहून निसटण्याची योजना त्यांनी आखली होती. 16 ऑगस्ट रोजी रामसिंग शंभूराजांसोबत औरंगजेबाच्या दरबारी मुजऱ्यास गेला असता औरंगजेबाने महाराजांनी मनसब कबुल करून त्यांच्याकडील किल्ले बादशहास सोपवून काबुलच्या स्वारीवर जावे असे आदेश दिले. परंतु,शिवाजी महाराजांनी बादशाहाचा हा आदेश नाकारला. औरंगजेबाचा हा शेवटचा इशारा शिवाजी महाराजांना समजला. त्यानंतर त्यांनी आग्राहून निसटण्याचे निश्चित केले. काही दिवसांपासून मनात सुरू असलेल्या योजनेला मूर्त स्वरुप देण्याची वेळ आली असल्याचे महाराजांच्या लक्षात आले.
17 ऑगस्ट रोजी शुक्रवारचा दिवस असल्याने औरंगजेबाचा दरबार बंद होता. मशिदीत बादशाहसह सर्व जनता आणि दरबारी अधिकारी नमाजासाठी जाणार होते. शंभूराजे आज महाराजांसोबतच असणार होते. दुपारच्या सुमारास महाराजांची प्रकृती ठीक नसल्याचा संदेश सैनिकांपर्यंत पोहचवण्यात आला. बरं वाटत नसल्याने महाराज झोपी गेले आणि एक मुलगा त्यांचे पाय चेपीत तेथे बसला. तर, दुसरीकडे मथुरेतील ब्राम्हण आणि फाकीरांना मिठाई वाटण्यासाठी पेटाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली. महाराज झोपेतून उठले आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद झोपी गेले. संध्याकाळच्या वेळी पेटारे मथुरेस रवाना झाले. त्यातील दोन पेटाऱ्यात शिवाजी महराज आणि शंभूराजे बसले. पहारेकऱ्यांनी पहिले दोन पेटारे तपासले, पण उर्वरित पेटारे ना तपासताच जाऊ दिले आणि महाराज बादशहाच्या कैदेतून निसटले. जवळपास एक हजार मुघल सैनिकांना चकवा देत गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी आग्रा किल्ल्यातून सुटका केली आणि स्वराज्यात परतले.
1905: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म
शंकर गणेश दाते हे मराठी सूचीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 1800 ते 1950 या दीडशे वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केलेली आहे. या दोन्ही खंडांत मिळून 26607 इतक्या मराठी ग्रंथांची नोंद झालेली आहे. मात्र, मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचेही संकलन केले आणि ग्रंथालयशास्त्रावर पुस्तके लिहीली.
1909: क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा हुतात्मा दिन
मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा विसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.
इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला. मदनलाल धिंग्रा हे होमरूल लीग आणि सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे 1 जुलै 1909 रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या. वायलीच्या हत्येबद्दल त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
1949 : भारतीय इतिहास अभ्यासक लेखक निनाद बेडेकर यांचा जन्म
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. रेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते.
इतर घटना :
1850: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन.
1893: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म
1945 : इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य मिळाले
1982: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.
1988: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.
2008: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.