12th June In History : अॅना फ्रँकचा जन्म, नेल्सन मंडेलांना जन्मठेप आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय; आज इतिहासात
On This Day In History: धर्माने ज्यू असलेल्या आणि हिटलरच्या कैदेत सापडलेल्या अॅना फ्रँकचा मृत्यू वयाच्या 14 व्या वर्षी (Anne Frank Death)झाला. नंतर तिच्या डायरीवर पुस्तक प्रदर्शित झालं.
12th June In History : जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये 12 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या नेल्सन मंडेला यांना आफ्रिकन सरकारने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर भारताच्या राजकीय इतिहासात आजच्या दिवसाला अन्यसाधारण महत्व आहे. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतला होता.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 12 जून या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे,
1929 : अॅना फ्रँकचा जन्म (Who was Anne Frank)
दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या छळाचा बळी ठरलेल्या अॅना फ्रँक (Anne Frank) या ज्यू मुलीचा जन्म. नाझींच्या बंदिवासात लिहिलेली अॅनाची डायरी नंतर पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित झाली. या पुस्तकामुळे अॅनाचं नाव जगभर पोहोचलं.
अॅनाचा जन्म फ्रँकफर्ट, जर्मनी येथे झाला. 1934 मध्ये जेव्हा ती साडेचार वर्षांची होती, तेव्हा अॅडॉल्फ हिटलर (Hitler) आणि नाझी पक्षाने जर्मनीवर नियंत्रण मिळवले आणि तिचे कुटुंब नेदरलँडला गेले. तिने आपले बहुतेक आयुष्य अॅमस्टरडॅममध्ये आणि त्याच्या आसपास घालवले. 1940 साली जर्मनीने नेदरलँड ताब्यात घेतले. त्या देशातील ज्यू लोकांना पकडून हिटलरचे सैन्य त्यांना ठार मारायचे. म्हणून अॅना फ्रँक (anne frank biography) ज्या इमारतीमध्ये राहत होती त्या इमारतीच्या बुककेसच्या मागे असलेल्या सिक्रेट खोलीमध्ये लपून राहिली. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना अटक होईपर्यंत म्हणजे 4 ऑगस्ट 1944 पर्यंत ती डायरी लिहायची. नंतरच्या काळात ती जर्मनीच्या सैन्याच्या हाती लागली आणि तिचा अवघ्या 14 व्या वर्षीच मृत्यू झाला.
अॅनाच्या मृत्यूनंतर तिची ही डायरी 'द डायरी ऑफ अ यंग गर्ल' (The Diary Of A Young Girl) या नावाने प्रसिद्ध झाली. 1942 ते 1944 या दरम्यान, लपून जगलेल्या आयुष्याचे दस्तऐवज या डायरीमध्ये तिने मांडले आहे.
1964: नेल्सन मंडेला यांना जन्मठेपेची शिक्षा (Nelson Mandela History)
आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व करणारे कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला (Nelson Mandela) यांना सरकारविरुद्ध कट रचल्याबद्दल दोषी ठरवून 12 जून 1964 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मंडेला 1944 मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आणि त्यांनी वर्णभेदाविरोधात लढा सुरू केला. नेल्सन यांनी लवकरच आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीगची स्थापना केली आणि तीन वर्षांनंतर ते त्याचे सचिव बनले. काही वर्षांनी मंडेला यांची आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही निवड झाली. मंडेला आणि त्यांच्या मित्रांवर 1961 साली देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. पण त्यात त्यांना निर्दोष मानले गेले.
यानंतर पुन्हा एकदा त्यांना 5 ऑगस्ट 1962 रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी कामगारांना संपासाठी प्रवृत्त करणे आणि परवानगी न घेता देश सोडून जाणे यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याचवेळी 1964 ते 1990 या काळात वर्णभेदाविरोधात सुरू झालेल्या चळवळीमुळे त्यांना आयुष्यातील 27 वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्याच्या शिक्षेदरम्यान त्यांना रॉबेन बेटावर तुरुंगात ठेवण्यात आले होते.
नेल्सन मंडेला हे महात्मा गांधींजींप्रमाणे अहिंसक मार्गाचे समर्थक होते. त्यांनी गांधींना प्रेरणास्रोत मानले आणि त्यांचा अहिंसेचा विचार जगभर पसरवला. 1993 मध्ये त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं.
1975 : इंदिरा गांधी भ्रष्टाचारप्रकरणी दोषी, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय (Indira Gandhi Disqualification)
सन 1975 सालचा जून महिना भारतीय राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची निवडणूक अवैध ठरवली. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना सरकारी यंत्रणेचा निवडणुकीमध्ये गैरवापर केल्याचा आरोप करत राजनारायण यांनी उच्च न्यायालयात एक याचिका (State of Uttar Pradesh vs Raj Narain) दाखल केली होती. 1971 सालच्या निवडणुकीच्या संबंधित ही गोष्ट होती. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court disqualified PM Indira Gandhi) हा ऐतिहासिक निर्णय घेतला.
न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणुकीत परवानगीपेक्षा जास्त पैसा खर्च केल्याबद्दल आणि सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले. तसेच इंदिरा गांधी यांना पुढच्या सहा पाच वर्षांसाठी कोणतेही राजकीय पद धारण करण्यास मनाई केली. मात्र न्यायालयाचा हा निर्णय प्रत्यक्षात येऊ शकला नाही. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली.
1998: भारत आणि पाकिस्तानला अणुचाचणी केल्यामुळे G-8 देशांकडून कर्ज न देण्याचा निर्णय. India Atom Bomb Test)
2000 : मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (Purushottam Laxman Deshpande) म्हणजेच पु. ल. देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार आणि पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ 2002 साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले. त्यांना भारतातील चौथा आणि तिसरा सर्वोच्च पुरस्कार अनुक्रमे पद्मश्री (1966) आणि पद्मभूषण(1990) साली देण्यात आला.
2002 : बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यास सुरुवात
जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेतर्फे (ILO) बालकामगार विरोधी दिन (Anti-Child Labor Day) साजरा करण्यात येतो. 12 जून 2002 पासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये बालमजुरीबद्दल जागृती करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश होता.
2007: शीख विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील शाळांमध्ये धार्मिक चिन्ह किरपाण ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
2018: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सिंगापूरमध्ये उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन यांची भेट घेतली. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या या दोन देशांच्या प्रमुखांची ही पहिलीच भेट होती.