11th March In History : छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यातिथी, जपानमध्ये भूकंप; आज इतिहासात
11th March In History : छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने छळ-छळ करून ठार केले.
11th March In History : 11 मार्च रोजी इतिहासात अनेक घटना घडल्या. परंतु, मराठा सामराज्यासाठी आजचा दिवस काळा दिवस मानला जातो. आजच्याच दिवशी म्हणजे 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने छळ-छळ करून ठार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे पेलली. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजांनी यशस्वीपणे राबवल्या. याशिवाय इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत.
1689 : छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यातिथी
छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने छळ-छळ करून ठार केले. त्यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे पेलली. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजांनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही.
संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला संभाजी राज्यांनी सळो की पळो करून सोडले होते.
1881 : कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये रामनाथ टागोरांचा पुतळा उभारला
11 मार्च 1881 रोजी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये रामनाथ टागोरांचा पुतळा उभारण्यात आला. एखाद्या भारतीयाचा पुतळा सार्वजनिक ठिकाणी उभारण्याची ही पहिलीच वेळ होती. रामनाथ टागोर हे 19व्या शतकातील अग्रगण्य सामाजिक व्यक्तींपैकी एक होते.
1915 : भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांची जयंती
विजय हजारे यांचा जन्म 11 मार्च 1915 रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. त्यांचे वडील शालेय शिक्षक होते. विजय हजारे फलंदाज आणि मध्यम वेगवान गोलंदाज होते. क्रिकेटमध्ये आपलं करिअर घडवू पाहत असताना दुसर्या महायुद्धामुळे त्यांच्या करिअरने स्टॉप घेतला होता. त्यामुळे त्यांना क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी काही वेळ लागला. पण दरम्यानच्या काळात त्यांनी घरगुती क्रिकेटमधील खेळाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. हा काळ भारतीय क्रिकेटसाठी अतिशय कठीण होता. पण याच काळात भारतात क्रिकेट टिकवून ठेवण्याचे मोठं श्रेय विजय हजारे यांना जातं. त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर 20-30 हजार प्रेक्षक जमायचे.
चार सामन्यांत 1000 धावा
1943–44 मध्ये विजय हजारे यांनी 1423 धावा ठोकल्या. या दरम्यान त्यांनी चार सामन्यांत 248, 59, 309, 101, 223 आणि 87 अशा एकूण 1423 धावांचा रतीब घातला. एकूणच चार सामन्यात त्यांवी 1000 धावा केल्या होत्या.
विजय हजारे यांची 309 धावांची खेळी खूपच संस्मरणीय ठरली. हिंदू संघाविरूद्ध खेळताना हजारे यांनी हा डाव खेळला. गमतीची गोष्ट अशी की तिहेरी शतक झळकावूनही त्यांचा संघ 387 धावांवर बाद झाला. म्हणजे उर्वरित फलंदाज 78 धावा करू शकले. यामुळे त्यांच्या संघाला एका डावाने पराभव पत्करावा लागला होता.
1948 : देशातील पहिले जहाज 'जल उषाचे' विशाखापट्टणम येथून जलावरण
देशातील पहिले जहाज 'जल उषाचे' विशाखापट्टणम येथून जलावरण झाले. त्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्व आधुनिक यंत्रणांनी ते सुसज्ज होते. हिंदुस्थान शिपयार्ड हे देशातील सर्वात मोठे जहाज बांधणी यार्ड आहे. या शिपयार्डमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले जहाज 'जल उषा' बांधले गेले.
1985 : मिखाईल गोर्बाचेव्ह यांची सोव्हिएत युनियनचे सर्वोच्च नेते म्हणून निवड
कॉन्स्टँटिन चेरनेन्को यांच्या निधनानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांची सोव्हिएत युनियनचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. शीतयुद्ध संपवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1985 मध्ये त्यांनी रशियाची सुत्रं स्वीकारली आणि USSR ला जगासमोर आणलं आणि मायदेशी अनेक महत्त्वाचे बदल घडवले. मात्र सोव्हिएत युनियनची पडझड ते रोखू शकले नाहीत. त्यातूनच रशियाचा जन्म झाला होता.
गोर्बाचेव्ह वयाच्या 54 व्या वर्षी सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सचिव आणि देशाचे नेते झाले. त्यावेळी पॉलिट ब्युरो मध्ये असलेले ते सर्वात तरुण सदस्य होते. अनेक वयोवृद्ध नेत्यानंतर त्यांच्याकडे एक उदयोन्मुख नेता म्हणून बघितलं जात असेल. त्यांचे पूर्वसुरी कोन्स्टानिन चर्नेको यांचं 73 व्या वर्षी निधन झालं होतं. त्यानंतर गोर्बाचेव्ह यांनी सूत्रं हातात घेतली होती.
1990 : लिथुआनियाने स्वतःला सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र घोषित केले
संसदेत मतदानानंतर लिथुआनियाने स्वतःला सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र घोषित केले. असे करणारे ते पहिले सोव्हिएत प्रजासत्ताक देश होता. लिथुआनिया हा युरोप खंडाच्या उत्तर भागात बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला देश आहे. हे तीन बाल्टिक देशांपैकी (लिथुआनिया, लाटव्हिया आणि एस्टोनिया) सर्वात मोठे आहे. त्याची राजधानी विल्निअस आहे. लिथुआनियन हा बाल्टिक समुदाय आहे आणि लिथुआनियन भाषा ही इंडो-युरोपियन भाषा कुटुंबातील बाल्टिक शाखेतील फक्त दोन जिवंत भाषांपैकी एक आहे.
1996 : द सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्याविरोधातील फतवा मागे घेतला
इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्या 1988 मधील 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या कादंबरीसाठी मृत्यूदंडाचा फतवा जारी केला होता. फतव्यामध्ये खोमेनी यांनी जगातील मुस्लिमांना 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशकांना त्वरीत शोधून काढण्याचे आवाहन केले होते, जेणेकरुन भविष्यात इस्लामच्या पवित्र मूल्यांना धक्का लावण्याचे धाडस कोणी करू नये. रश्दी यांच्यावर 28 लाख डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आले होते. रश्दींच्या खुनाचा प्रयत्न करताना कोणी मारले गेले तर त्याला शहीद समजावे आणि त्याला स्वर्ग मिळेल असे खोमेनी म्हणाले होते. या फतव्याने रश्दींचे आयुष्य कायमचेच बदलून गेले. पुढील 13 वर्षांत रश्दींनी जोसेफ अँटोन हे टोपणनाव धारण केले आणि पहिल्या 6 महिन्यांत 56 वेळा घरे बदलली. सलमान रश्दी यांच्याविरोधात काढलेला फतवा इराणने 11 मार्च 1996 रोजी मागे घेतला.
2004 : स्वेनमध्ये तीन रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोट
स्पेनमधील तीन रेल्वे स्थानकांवर 11 मार्च 2004 रोजी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 190 लोक ठार झाले होते. तर 1200 लोक जखमी झाले होते.
2008 : अंतराळ यान एंडेव्हर आपल्या अंतराळ स्थानकावर पाठवले
यूएस स्पेस एजन्सी नासाने आपले अंतराळ यान एंडेव्हर हे 11 मार्च 2008 रोजी आपल्या अंतराळ स्थानकावर पाठवले.
2011 : भारताने 350 किमी पल्ल्याच्या 'धनुष' आणि 'पृथ्वी' क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली
भारताने आजच्या दिवशी म्हणजे 11 मार्च 2011 रोजी 350 किमी पल्ल्याच्या 'धनुष' आणि 'पृथ्वी' क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली.
2011 : जपानमधील भूकंपात 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
11 मार्च या तारखेला इतिहासात नोंदवलेल्या घटनांमध्ये जपानमध्ये झालेला भीषण भूकंप आणि त्यानंतर समुद्रात उद्भवलेली भयंकर त्सुनामी ही सर्वात प्रमुख घटना आहे. तो 11 मार्च 2011 रोजी जपानच्या पॅसिफिक किनार्यावर तोहोकूजवळील समुद्रात 9-रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे त्सुनामी आली. ज्यामुळे 15,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जपानच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता.