(Source: ECI/ABP News/ABP Majha)
11 November In History : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले, पठ्ठे बापूराव यांचा जन्म; आज इतिहासात...
11 November In History :साने गुरुजी यांच्या सत्याग्रहानंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. आजच्या दिवशी लावणी लेखक पठ्ठे बापूराव यांचा जन्म झाला. त्याशिवाय, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलान अबुल कलाम यांचा जन्म आजच्या दिवशी झाला.
11 November In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आज, 11 नोव्हेंबर रोजीदेखील महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. साने गुरुजी यांच्या सत्याग्रहानंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. आजच्या दिवशी लावणी लेखक पठ्ठे बापूराव यांचा जन्म झाला. त्याशिवाय, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलान अबुल कलाम यांचा जन्म आजच्या दिवशी झाला.
1886 : लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचा जन्म
बापूराव ब्राह्मण असून त्यांच्याकडे कुलकर्णीपणाची वृत्ती होती. परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या आणि कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या आदी विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, त्यांची बरीचशी रचना आजही अनुपलब्ध आहे. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात. तमाशा कलाकारांमध्ये आदरांचे स्थान आहे.
1888 : स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म
मौलाना अबुल कलाम आझाद हे एक भारतीय प्रमुख राजकीय नेते होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे होते. अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना मिळाले. त्यांनी विविध देशांचा दौरा केला होता. वृत्तपत्रेही काढली होती. आझाद यांच्या वृत्तपत्रातून ब्रिटिशांवर टीका होत असल्याने त्यांच्यावर ब्रिटिश सरकारने निर्बंध लादले होते. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले. अबुल कलाम हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते.
1888 : स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी आचार्य कॄपलानी यांचा जन्म.
जीवतराम भगवानदास कृपलानी हे भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक राजकीय नेता होते व स्वतंत्रता सैनिक होते. त्यांना आचार्य कृपलानी या नावाने ओळखले जाते.भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ते गांधीवादी नेते होते.ते महात्मा गांधी चे अनुयायी होते.
1926: विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म
11 नोव्हेंबर 1926 रोजी इंदूरमध्ये जन्मलेल्या वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काझी होते. अभिनयाच्या विश्वात प्रवेश केल्यावर गुरु दत्त यांनी त्यांचं नाव बदलले. गुरू दत्त यांनी त्यांचे नाव एका प्रसिद्ध दारूच्या ब्रँडवरून ठेवले. पण खास गोष्ट म्हणजे चित्रपटांमध्ये जॉनी वॉकर अर्थातच मद्यपीच्या भूमिकेत असायचे, पण खऱ्या आयुष्यात त्यांनी दारूला कधी हात लावला नाही. 'बाजी' चित्रपटात तो पहिल्यांदाच दिसले. त्यानंतर जॉनी वॉकर यांनी गुरु दत्त यांच्या 'आर-पार', 'प्यासा', 'चौदहवीं का चांद', 'कागज के फूल', 'मिस्टर अँड मिसेस 55' या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
1936: हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने पडद्यावर छाप सोडणारी सुंदर आणि ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी कोलकाता येथे झाला. माला सिन्हा या साठ आणि सत्तरच्या दशकातील अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत काम करून खूप नाव कमावले. माला सिन्हाने हिंदीशिवाय बंगाली आणि नेपाळी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
माला सिन्हा यांनी बालकलाकार म्हणून सिनेविश्वात प्रवेश केला. त्यांनी सुरुवातीला अनेक बंगाली आणि नेपाळी चित्रपटांसाठी काम केले होते. माला सिन्हा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील बादशाह चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचा चित्रपट 1954 साली आला होता. यानंतर माला सिन्हा यांनी प्यासा, धूल के फूल, अनपढ, दिल तेरा दिवाना, आँखे, गीत और ललकार यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
1947 : पंढरपूरचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले
पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. अनेक वर्षांपासून राज्यभरातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येतात. असं असताना मंदिरात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्यांना प्रवेश नव्हता. कित्येक शतके हे असंच सुरु होतं. मात्र याविरोधात साने गुरुजी यांनी आवाज बुलंद केला. त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जातीच्या लोकांना खुले करण्यासाठी 1 मे 1947 ते 10 मे 1947 या काळात उपोषण केलं होतं. यानंतर अखेर 11 नोव्हेंबर 1947 मध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जातीच्या लोकांसाठी करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या घटना :
1872: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा जन्म
1942 : दुसरे महायुद्ध - नाझी जर्मनीने फ्रान्सचा कब्जा घेतला.
1975: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.
1997: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांचे निधन.
2004: यासर अराफत यांच्या मृत्यूपश्चात महमूद अब्बास यांची पॅलेस्टाईन मुक्ती संघटने (PLO) च्या अध्यक्षपदी नियुक्ती.
2005: नेत्रतज्ज्ञ डॉ. एम. सी. मोदी. यांचे निधन.