Lumpy Skin Disease : महाराष्ट्रात लम्पीतून आत्तापर्यंत 1 लाख 12 हजार जनावरे बरी, 97 टक्के लसीकरण पूर्ण
Lumpy Skin Disease : आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या बाधित जनावरांपैकी 1 लाख 12 हजार जनावरे बरी झाली आहे.
Lumpy Skin Disease : देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) झाला आहे. महाराष्ट्र राज्यात 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या बाधित जनावरांपैकी 1 लाख 12 हजार जनावरे बरी झाली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात 97 टक्क्यांहून अधिक जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे.
दिवसेंदिवस राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत राज्यातील 33 जिल्ह्यांतील एकूण 3 हजार 204 गावांमध्ये या लम्पी स्कीनच्या विषाणूचा प्रभाव दिसून आला आहे. बाधित गावातील एकूण 1 लाख 72 हजार 528 बाधित जनावरांपैकी 1 लाख 12 हजार 683 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. बाधित जनावरांवर सध्या उपचार सुरु आहेत. सर्व जनावरे वेगाने बरी होत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 140.97 लाख लसी उपलब्ध झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण 136.48 लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील सुमारे 97.54 टक्के गायींचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत 'या' जिल्ह्यामध्ये लसीकरण पूर्ण
दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यात जनावरांना लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करुन घेतलेल्या लसीकरणानुसार महाराष्ट्रात सुमारे 97.54 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.
जनावरांना लसीकरण करुन घेण्याचं आवाहन
लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं जर गायीचा मृत्यू झाला तर राज्य सरकारकडून पशुपालकांना 30 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपये दिले जातात. याशिवाय वासराचा जर मृत्यू झाला तर 16 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. लम्पी स्कीनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व जनावरांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी याबाबत सतर्क राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व पशुपालकांनी आपापल्या जनावरांना लसीकरण करुन घ्यावं असे आवाहन देखील राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: