Maharashtra Weather Update : विदर्भ-मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका, बळीराज्याच्या तोंडाचा घास हिरावला; मंत्री पंकजा मुंडे आज घेणार बीडच्या नुकसानीचा आढावा
Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने कहर केल्याचे चित्र आहे. सध्या जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी या अतिवृष्टीच्या नुकसानीची दाहकता आता समोर येत आहे.

Maharashtra Weather Update : गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने कहर केल्याचे चित्र आहे. सध्या जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी या अतिवृष्टीच्या नुकसानीची दाहकता आता समोर येत आहे. अशातच बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्री पंकजा मुंडे आज घेणार आहेत. यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्ह्यातील संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला असणार आहे.
बीड मधील आष्टी, शिरूर कासार, परळी, अंबाजोगाई तालुक्यासह अन्य तालुक्यात मागील काही दिवसात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह जिवीत आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. याच सर्व नुकसानीचा आढावा मंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत प्रशासनाकडून घेणार आहेत.
नदीच्या पुरात वाहून गेल्याने वयोवृद्ध शेतकर्याचा मृत्यू, परिसरात हळहळ
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात काल (20 सप्टेंबर) दुपारी मुसळधार पावसाने नदी- नाल्यांना पूर आला होता. दरम्यान खंडाळा मकरध्वज येथील शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग, (वय 85 वर्ष) हे शेतातून घरी परतत असताना नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी प्रशासनाने तत्काळ घटनास्थळ गाठून सर्वत्र शोध घेतला. मात्र आज सकाळी त्यांचा मृतदेह खंडाळा मकरध्वज ते शेलगाव जहागीर नदीपात्रात आढळून आला. या घटनेने खंडाळा मकरध्वज गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सीना नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या महिलेला तरुणांनी वाचवले
दुसरीकडे सोलापूर जिल्ह्याच्या सीना नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या महिलेला ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी वाचवले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळमध्ये सीना नदीच्या प्रवाहात हि महिला वाहून जात होती. यावेळी ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी समयसूचकता दाखवल्याने या महिलेचा जीव वाचलाय. दरम्यान कपडे धुण्यासाठी सीना नदीच्या काठावर आली असताना पाण्याच्या प्रवाहात तोल गेल्याने हि महिला वाहून जात होती. अशातच वाहून जात असताना एका काटेरी झूडपात अडकून महिला पडली होती. हा सर्व प्रकार समजल्यानंतर क्षणाचा ही विलंब न लावता ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी स्वतः च्या जीवाचा विचार न करता महिलेचे प्राण वाचवले आहे.
शिरापूरच्या युवकाचा अद्यापही शोध लागला नाही
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर भागात रात्री जोरदार पाऊस झाला. तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरापूर परिसरातील शेत जमीन वाहून गेली असून शेती पिकाचे मोठ नुकसान झालं आहे. गावाकडे जाणारा पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. याच पुलावरून गावाकडे जाणारा तीस वर्षीय तरुण वाहून गेला आहे. अतुल शेलार असं या तरुणाचं नाव असून त्याचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे.
























