Weather Update: राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग; नदी नाल्यासह धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ, वाचा पावसाच्या सर्व अपडेट्स
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर धारणसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या अनेक दिवासांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर धारणसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. या पावसाचा (Weather Update) काही ठिकाणी फायदा झाला आहे. तर काही ठिकाणी मात्र या पावसाने बळीराजाचं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, संभाव्य पावसाचा इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बीडच्या मांजरा धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, धरणाने गाठली 80% पातळी
गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे बीड मधील धनेगाव येथे असलेल्या मांजरा प्रकल्पात पाणीसाठा 80 टक्क्याच्या वर पोहोचलाय. मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झालीय. 15 ऑगस्ट रोजी दुपारी या धरणात 57 टक्के असलेला पाणीसाठा 16 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता थेट 80 टक्क्यावर पोहोचला आहे. यामुळे आता पुढील दोन वर्षापर्यंत परिसरातील पाणी प्रश्न मिटला आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा एक असून याच मांजरा धरणातून बीड, लातूर,धाराशिव जिल्ह्यातील 22 गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी देखील वापरण्यात येते.
संततधार पावसाने सहस्त्रकुंड धबधब्याला आले अक्राळविक्राळ रूप
नांदेडमध्ये संततधार पाऊस पडतोय, त्यामुळे पैनगंगा नदी पुरसदृश्य स्थितीत प्रवाहित झालीय. त्यामुळे पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याला अक्राळविक्राळ स्वरूप प्राप्त झालेय. इसापूर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून 4988 क्यूसेक्स वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले; 84 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग
बेंबळा धरणाच्या कॅचमेट एरियात दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे बेंबळा प्रकल्पाचे आज सकाळी 7 वाजता चार गेट 25 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे. यातून यामुळे 84 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. हे पाणी बेंबळा नदीपात्रात सोडले जात आहे. धरणाचे गेट उघडल्याने, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी भागातील नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले.
बीडमध्ये पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसात, शेताला आले तलावाचे स्वरूप
बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पावसाने थैमान घातले आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा, साळेगाव,मोगरा, गावासह परिसरातील तब्बल पंधरा गावात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. परिसरातील शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माजलगाव तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
बीड जिल्ह्यात संततधार पावसाने जिल्हा रुग्णालयातील छताचा काही भाग कोसळला
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमधील छताचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र रुग्णांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यातच पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेत येथील आरोग्य अधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती.
ही बातमी वाचा:
























